दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या नाशिक जिल्ह्य़ात अग्निबाणाच्या साहाय्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग मेघराजांनी पाठ फिरविल्याने रविवारी होऊ शकला नाही. त्यासाठी येवला तालुक्यातील सायगाव फाटय़ावर जय्यत तयारी करण्यात आली होती. सुमारे पाच हजार शेतकरी हा प्रयोग पाहण्यासाठी उपस्थित झाले; परंतु अपेक्षित ढगाळ वातावरण नसल्याने या प्रयोगाचा मुहूर्त टळला. सोमवारी पुन्हा हा प्रयोग राबविला जाणार आहे.
मुंबईच्या इंटरनॅशनल प्रोफेशनल स्टडीज् संस्था अग्निबाणाच्या साहाय्याने ढगांवर रासायनिक पदार्थाचा मारा करण्यासाठी विमानाऐवजी अग्निबाणाचा वापर करणार आहे. ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज घेऊन संस्थेने येवला-नांदगाव तालुक्यात हा प्रयोग राबविण्याचे निश्चित केले. येवला शहरापासून नऊ किलोमीटर अंतरावरील सायगाव फाटा येथे संस्थेचे प्रतिनिधी १० अग्निबाण घेऊन दाखल झाले. रघुनाथ खैरनार व वसंत खैरनार यांच्या शेतात अग्निबाण डागले जाणार होते. या प्रयोगाचा लाभ २० बाय २० किलोमीटर अर्थात ४० चौरस किलोमीटरच्या परिसरात होईल, असा दावा संस्थेने आधीच केला होता. त्याकरिता एचएएल, पोलीस आदी विभागांची परवानगी घेण्यात आली. नियोजनानुसार रविवारी सकाळी साडेदहा वाजता अग्निबाण डागण्याची यंत्रणा सज्ज करण्यात आली. या प्रयोगासाठी माजी मंत्री व येवल्याचे आमदार छगन भुजबळ उपस्थित होते. अवकाशात कृत्रिम पावसासाठी अनुकूल वातावरण नव्हते. पावसाला पोषक वातावरण निर्माण होईपर्यंत हा प्रयोग करता येणार नसल्याचे लक्षात आले. प्रयोग न झाल्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांची निराशा झाली. सोमवारी हा प्रयोग करण्याची तयारी संस्थेने ठेवली आहे.