जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असला तरी हा प्रकल्प होणारच असून राज्य व केंद्र सरकारने आपली भूमिका बदललेली नसल्याची ग्वाही उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली. विरोधकांनी सरकारची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचा उल्लेख विरोधकांनी केला. पण यावेळी शिवसेनेचे मंत्री सभागृहात नव्हते आणि आमदारांनीही मते व्यक्त केली नाहीत.
यासंदर्भात संजय दत्त, भाई जगताप आदींनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सरकारवर हल्ला चढविला. उद्धव ठाकरे यांचा या प्रकल्पाला विरोध असून आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत व प्रकल्पाला परवानगी देणार नाही, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नुकतेच जाहीर केले आहे. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याने आता या प्रकल्पाचे भवितव्य काय असा प्रश्न सुनील तटकरे यांनी उपस्थित केला.
त्यावर हा केंद्र सरकारचा प्रकल्प असून त्यासाठी त्यांचाच निधी देण्यात आला आहे. राज्य सरकार केवळ भूसंपादन करून देत आहे. हे काम झाले असून प्रकल्पाचा पुढील निर्णय केंद्र सरकारनेच घ्यायचा आहे, असे उत्तर बावनकुळे यांनी दिल्यावर विरोधकांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली, तेव्हा विधिमंडळ कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सरकारची भूमिका मांडली आणि प्रकल्पाला पाठिंबाअसल्याचे स्पष्ट झाले.