News Flash

राज्यात खरंच करोना मृतांची आकडेवारी लपवली जातेय का? आरोग्य विभागाने केला खुलासा!

राज्य सरकार करोना मृतांची आकडेवारी लपवत असल्याचे आरोप झाल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाकडून त्यासंदर्भात सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात करोना मृत्यूंची आकडेवारी खरंच लपवली जातेय का?

गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून राज्य सरकारवर करोनाविषयीची आकडेवारी लपवली जात असल्याची टीका केली जात आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्य सरकारकडून मृतांची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या आरोग्य विभागानेच या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. “कोरोनाची रुग्णसंख्या, बरे होणारे रुग्ण, मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यासाठी महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण यंत्रणा पारदर्शकपणे काम करत असून कोणतीही आकडेवारी लपविण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यापूर्वीच अतिशय पारदर्शकपणे कोरोना रुग्णसंख्येची माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा माहिती प्रलंबित राहते. तथापि ती अद्ययावत करण्यासाठी जिल्हा आणि मनपा यांचेकडे नियमित पाठपुरावा केला जातो”, असं स्पष्टीकरण आरोग्य विभागाकडून देण्यात आलं आहे. यासाठी नेमकी रोजची रुग्णांची आकडेवारी कशी तयार केली जाते, याची प्रक्रियाच आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

कशी होते रुग्णसंख्या, मृत्यूंची नोंद?

> केंद्र सरकार कोविड रिपोर्टिंगसाठी दोन पोर्टलचा वापर करते. १) आयसीएमआरचे सीव्ही अॅनालिटिक्स पोर्टल (बाधित रुग्णांसाठी) आणि कोविन १९ पोर्टल (मृतांच्या आकड्यांसाठी). या शिवाय प्रयोगशाळांसाठी आरटीपीसीआर ॲप आणि रुग्णालयांसाठी फॅसिलिटी ॲप वापरण्यात येते.

> प्रत्येक प्रयोगशाळा आपण केलेल्या नमुना तपासणीची व्यक्तीनिहाय माहिती आरटीपीसीआर ॲपद्वारे आयसीएमआरच्या सी.व्ही. अॅनालिटिक्स पोर्टलवर भरत असते.

> राज्यातील दैनंदिन आकडेवारी तयार करण्यासाठी रोज रात्री १२ वाजेपर्यंतची बाधित रुग्णांची यादी आयसीएमआरच्या सी.व्ही. अॅनालिटिक्स पोर्टलवरुन तर मृत्यूची यादी कोविड १९ पोर्टलवरून राज्य आणि जिल्हास्तरावर डाउनलोड करण्यात येते.

> यातून राज्य आणि जिल्हा स्तरावर दुहेरी नोंदी असलेले रुग्ण वगळण्यात येतात. साधारण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खातरजमा केल्यानंतर सर्व जिल्ह्यांची अंतिम माहिती राज्य कार्यालयास प्राप्त होते. या माहितीच्या आधारेच राज्याचा अंतिम अहवाल आणि प्रेस नोट तयार केली जाते.

> रिकॉन्सिलिएशन अर्थात ताळमेळ प्रक्रिया साधारणपणे दर पंधरा दिवसांनी केली जाते. यात दोन्ही पोर्टलवरील माहिती आणि राज्य अहवाल यातील माहितीची तुलना केली जाते आणि तांत्रिक कारणाने झालेले फरक दूर केले जातात. प्रयोगशाळा आणि रुग्णालये अनेकदा जुनी माहिती पोर्टलवर अद्ययावत करतात. ही माहिती राज्य अहवालात घेता यावी आणि राज्य अहवाल अद्ययावत करता यावा यासाठी ही ताळमेळ प्रक्रिया आवश्यक असते.

अनलॉकला आठवडा पूर्ण! जिल्हानिहाय नवी आकडेवारी जाहीर! सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट कोल्हापूरचा

माहितीत तफावत का?

दरम्यान, रुग्णांच्या किंवा मृतांच्या माहितीमध्ये नेमकी तफावत का दिसून येते, याविषयी देखील आरोग्य विभागानं स्पष्टीकरण दिलं आह.

> हॉस्पिटल्सना आपल्याकडची माहिती अद्ययावत करण्यासाठी फॅसिलिटी अॅप ही ऑनलाईन सेवा देण्यात आली आहे. पण अनेक रुग्णालये, विशेषतः खाजगी रुग्णालये या फॅसिलिटी ॲपवर त्यांच्याकडील रुग्णांची माहिती अद्ययावत करत नाहीत. त्यामुळे किती रुग्ण बरे होऊन घरी गेले अथवा किती जणांचा मृत्यू झाला याबाबत रिअल टाइम डेटा मिळण्यामध्ये अडचणी येतात.

> हॉस्पिटलस्तरावरुन विलंब झाल्यास जिल्हास्तरावर ही माहिती संकलित करून ती कोविड पोर्टलवर अपलोड केली जाते. परंतु या प्रक्रियेमध्ये अनेकदा बराच वेळ लागतो. यामुळे काही मृत्यूची माहिती बऱ्याच कालावधीकरता प्रलंबित राहते.

> आयसीएमआर पोर्टलवर प्रयोगशाळा आपली माहिती भरतात. परंतु, अनेकदा प्रयोगशाळांकडील तपासलेल्या नमुन्यांची सर्व माहिती वेळेवर भरली जात नाही. त्यामुळे अशा रुग्णांची डिस्चार्ज किंवा मृत्यूविषयक माहिती देखील वेळेत भरण्यामध्ये अडचणी येतात.

> दोन पोर्टलमधील माहिती एकत्रित होण्यासाठी लागणारा वेळ (Synchronization) आणि इतर तांत्रिक कारणांमुळे देखील माहितीमध्ये तफावत आढळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 7:53 pm

Web Title: maharashtra health department clarification on hiding corona death numbers allegations pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 मराठा आरक्षण : “… वादळापूर्वीची ही शांतता”; संभाजीराजेंनी दिला सूचक इशारा!
2  महाड – ऐतिहासिक चवदारतळे जल शुध्दीकरणाच्या कामास प्रारंभ; अमेरिकन कंपनीच्या यंत्राचा वापर
3 उदयनराजे-संभाजीराजेंची पुण्यातील भेट रद्द; उदयनराजेंनी सांगितलं कारण
Just Now!
X