राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी राज्यातील तीन पदवीधर व एका शिक्षक मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपानं चार जणांची नावं जाहीर केली आहे. यात पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना संधी देण्यात आली आहे.

राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांच्या निडणुकांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार असून, आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर २ जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात (डिसेंबर) १ तारखेला मतदान होणार आहे. यापैकी चार जागांवर भाजपाकडून उमेदवारा जाहीर करण्यात आले आहेत.

भाजपाने पुणे मतदारसंघातून संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. तर औरंगाबादमधून शिरीष बोराळकर, नागपूर पदवीधर मतदारसंघातून संदीप जोशी व अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन रामदास धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण आणि नागपूरमधून अनिल सोले यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपला. तर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानसभेवर गेल्याने पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा रिक्त राहिली. एकूण पदवीधर मतदारसंघाच्या तीन जागा रिक्त आहेत. तर शिक्षक मतदरासंघातून अमरावती विभागातून श्रीकांत देशपांडे आणि पुणे विभागातून दत्तात्रय सावंत यांचा कार्यकाळसुद्धा जुलै महिन्यात संपला. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातून अमरावती आणि पुणे विभागाच्या दोन जागा रिक्त आहेत.