वाढत्या करोनाला पायबंद घालण्यासाठी लॉकडाउन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असून, तसा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे सगळीकडे लॉकडाउनवरून चर्चा सुरू झाली आहे. लॉकडाउनच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. त्याला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं. आव्हाडांनी सवाल केल्यानंतर आशिष शेलार फडणवीसांच्या मदतीला धावून आले आहेत.

जीएसटीच्या मुद्द्यावरून आव्हाड यांनी फडणवीस यांना टोला लगावला होता. “२० लाख कोटी हे मी शब्दात लिहू शकतो. पण आकड्यात किती शून्य येतात हे माझी स्मरणशक्ती कामकुवत असल्याकारणाने काही जमत नाही. आपली स्मरणशक्ती मजबूत असल्याकारणाने या शून्यांमधील किती शून्य महाराष्ट्राच्या वाट्याला आले. हे जर सांगितल तर ते मी नक्कीच पाठांतर करून माझ्या स्मरणात ठेवीन,” असं आव्हाडांनी फडणवीसांना विचारलं होतं.

आव्हाड यांनी फडणवीसांना केलेल्या टीकेला प्रश्नाला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. “२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत जीएसटी कम्पेन्सेशनचे ७० हजार कोटी रूपये विविध राज्यांना देण्यात आले आहेत. अगदी ५ दिवसांपूर्वी, २७ मार्च २०२१ रोजी सुद्धा ३० हजार कोटी रूपये विविध राज्यांना देण्यात आलेत. त्यातील सर्वाधिक ४४४६ कोटी रूपये महाराष्ट्राला मिळालेत. महाराष्ट्रातील वसुली सरकारने आता केंद्राकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकणे थाबंवावे… तुमच्या रडगाण्यांना जनता विटली आहे! करोनानं हाहाकार माजवलाय… कायदा सुव्यवस्था कोलमडून गेली आहे. देशभरात महाराष्ट्राची बदनामी होतेय.. तुम्ही स्वतः काही तरी करुन दाखवा! किमान रडायचे तरी थांबवा!,” असं म्हणत आमदार आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीस काय म्हणाले होते?

“जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. केंद्र सरकारनं लॉकडाऊनच्या काळात नुकसान झालेल्या लोकांच्या मदतीसाठी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज दिलं,” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावरून आव्हाड यांनी उलट सवाल केला होता. “फक्त एवढंच तुम्हांला आठवणीनं सांगतो की, केंद्र सरकारनं सुरुवातीच्या काळामध्ये दिलेली वैद्यकीय सामुग्री पीपीई किट, व्हेंटिलेटर इ. वैद्यकीय सामान देखील काही दिवसानंतर देण्याच बंद केल होतं. एवढं माझ्या स्मरणात आहे,” अशा शब्दात आव्हाड यांनी फडणवीसांना उत्तर दिलं आहे. “आरे हो, महाराष्ट्राचे हक्काचे जीएसटीचे २४००० कोटी केंद्राकडे बाकी आहेत ते आपल्या एका शब्दावर मिळतील. देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्राच्या हिता साठी तेवढे करा …टीका पण करा,” असा चिमटाही आव्हाड यांनी काढला होता.