राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेकदा ते कोणत्या ना कोणत्या विषयांवर भाष्य अथवा आपलं मत व्यक्त करत असतात. अनेक मुद्द्यांवर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही टीकाही केल्याचं यापूर्वी दिसून आलं आहे. यावेळीही एका उद्घाटनाप्रसंगी रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.

रोहित पवार हे मंगळवारी बारामतीतील एका चहाच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी गेले होते. त्यांनी दुकानाच्या उद्धाटनाचे काही फोटो शेअर केलं आहे. फोटो शेअर करतानाच रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. “राजकारणात चहा विकल्याचं भांडवल केलं जातं, पण आमच्या बारामतीत मात्र राहुल चौधरी यांनी ‘खासदार’ तर माळेगावमध्ये तेजस तावरे यांनी ‘आमदार’ या नावाचंच चहाचं हॉटेल सुरू केलंय,” असं ते म्हणाले. “मी लहानपणी चहाच्या स्टॉलवर काम करत होतो,” अशी आठवण सांगताना अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचंही आपण पाहिलं आहे.

आणखी वाचा- शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द? एकनाथ खडसे म्हणतात…

यापूर्वीही भाजपा नेत्यांवर साधला निशाणा

रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर काही दिवसांपूर्वी अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेत महविकासाघाडी सरकारवर टीका करणे सुरू केलं होतं. ही कारवाई पाहून आणीबाणीच्या काळाची आठवण होत असल्याचे, भाजपा नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं. शिवाय, राज्य सरकारविरोधात भाजपाकडून आंदोलनदेखील करण्यात आलं होतं. भाजपा नेत्यांनी केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं होतं. सरकार विरोधात लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करताना, विविध माध्यमांना त्रास देताना भाजपा नेत्यांना आणीबाणी आठवत नाही? असा प्रश्न त्यांनी केला होता.