News Flash

…तर आज शिवसेनाच उरली नसती; अमित शाह यांचा घणाघात

शिवसेनेला बंद दाराआड कोणतंही वचन दिलं नव्हतं

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं शिवसेनेवर टीकास्त्र.

विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून नाराज होत शिवसेनेनं भाजपासोबत युती तोडत काँग्रेस व राष्ट्रवादीशी आघाडी केली. भाजपानं मुख्यमंत्रीपदासह सत्ता वाटपात ५०-५० स्थान देण्याचं वचन दिलं होतं, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. बंद दाराआड झालेल्या बैठकीतील वचनावर भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी मौन आज सोडलं. कोणतंही वचन दिलं नसल्याचं ठणकावून सांगत अमित शाह यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवर घणाघाती टीका केली.

नारायण राणे यांच्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झालं. यावेळी शाह यांनी शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या आरोपाचा समाचार घेतला. “मी भाजपाध्यक्ष असताना महाराष्ट्रात निवडणुका झाल्या होत्या. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो होतो. पण, त्यानंतर तीन चाकी रिक्षाचं सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आलं. तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेनं चालतात. हे सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरलं आहे. मी आज महाराष्ट्रातील जनतेला सांगण्यासाठी आलो आहे. तुम्ही जो जनादेश दिला होता, त्याचा अपमान करून सत्तेच्या लालसेपोटी इथे सरकार स्थापन करण्यात आलं. मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेनेच्या सरकारसाठी जनादेश होता. जे म्हणत आहेत की आम्ही वचन तोडलं. त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की आम्ही वचनावर ठाम राहणारी माणसं आहोत. अशा प्रकारचं खोटं आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही निवडणूक लढलो. आम्ही वचन दिलं होतं की एनडीएचं सरकार आलं, तर मुख्यमंत्री नितीश कुमार होणार. आमच्या जागा जास्त येऊनही आम्ही नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं,” अशा शब्दात अमित शाह यांनी शिवसेनेला उत्तर दिलं.

पुढं बोलताना अमित शाह म्हणाले,”हे म्हणत आहे की, एका खोलीत वचन दिलं होतं आणि मी ते वचन दिलं होतं. मी काही खोलीत करत नाही. जे करतो ते सगळ्यांसमोर करतो. डंके की चोट पर करता हूँ. मी कधीही बंद दाराआडील राजकारण केलं नाही. मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे. कुणालाही घाबरत नाही. सगळ्यांसमोर बोलतो. मी असं कोणतंही वचन दिलेलं नव्हतं. वचन दिलं होतं, असं मानलं तरी उद्धवजी तुमच्यापेक्षा अडीचपट मोठा फोटो नरेंद्र मोदींचा वापरू प्रचार करत होते. मोदीजींच्या नावावर मतं मागितली. माझ्यासोबत सभा झाली. मोदीजींसोबत सभा झाली. प्रत्येक ठिकाणी बोललो एनडीएचं सरकार निवडून द्या. फडणवीसजी मुख्यमंत्री होणार. त्यावेळी का नाही बोलले? पण, असं कोणतंही वचन दिलेलं नव्हतं. सत्तेच्या मोहात बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांना नदीत सोडून सत्तेत बसले. कलम ३७० हटवलं, घाबरत घाबरत म्हणतात आम्ही स्वागत करतो. राम मंदिर बनवण्याचा निर्णय होतो. तेव्हाही मी जाईल… जाणार नाही. काय झालं? आम्ही तर कधीच घाबरलो नाही. भाजपा सिद्धांतासाठी राजकारणात आलेली आहे. राजकारणासाठी सिद्धांत तयार करत नाही. मी शिवसेनेच्या मित्रांना सांगू इच्छितो की, तुम्ही सिद्धांतांसाठी आलेला नाहीत. बाळासाहेब गेले. आता राजकारणासाठी सिद्धांतांची तोडमोड सुरू आहे. पण, महाराष्ट्रातील जनतेला चांगलं माहिती आहे. मी इतकंच सांगू इच्छितो की, आम्ही तुमच्या रस्त्यावर चालणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर तुमच्या पक्षाचं अस्तित्व राहिलं नसते,” असं म्हणत अमित शाह यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 4:08 pm

Web Title: maharashtra politics amit shah attack on shivsena uddhav thackeray ncp congress bmh 90
Next Stories
1 “सरकारी सवलतींना सोकावलेल्या सेलिब्रिटींनो… जरा भान ठेवा, विसरू नका…”; राजू शेट्टी भडकले
2 “जनतेचे खिसे कसे कापतो, हे कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून केंद्राने ही चाल खेळली”
3 Success Story : सफाई कर्मचारीचा मुलगा झाला तहसीलदार
Just Now!
X