गणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यास राज्य सरकारने शुक्रवारी परवानगी दिली होती. नुकतीच एसटी गाड्या सोडण्याचीही मंजुरी दिल्यानंतर आता रेल्वेही कोकणसाठी धावणार होत्या. परंतु राज्य सरकारनं चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात येणाऱ्या ट्रेनच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती दिली आहे. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी मध्य रेल्वेला विशेष गाड्या चालविण्यासाठी एक पत्रही पाठवलं होतं. मुंबई मिररनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

११ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवसाठी विशेष रेल्वे सोडण्याच्या निर्णयानंतर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनं विशेष तयारीही केली होती. वेळापत्रकाप्रमाणे रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस या स्थानकांपासून सावंतवाडीपर्यंत रेल्वे सेवेचं नियोजन केलं होतं. तसंच हे वेळापत्रक शुक्रवारी रेल्वे बोर्डालाही पाठवण्यात आलं होतं.

“गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या १९० विशेष रेल्वेगाड्यांना परवानगी देण्यात आली होती. परंतु राज्य सरकारनं हा निर्णय तुर्तास स्थगित केला आहे. सोमवारी आम्हाला याबाबत तोंडी माहिती देण्यात आली. परंतु आम्ही लिखित स्वरूपात तो देण्यास सांगितलं आहे,” अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न घेण्याच्या अटीवर सांगितली.

सोमवारी संपूर्ण दिवस राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची यासंदर्भात चर्चा सुरू होती. मात्र, रात्री उशिरापर्यंतही गाड्या सुटणार की नाही याबाबत स्पष्टता आली नव्हती. “कोकणात विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु आम्ही राज्य सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहोत,” अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.