23 October 2018

News Flash

उद्रेक शमला, मने दुभंगली!

सांगलीत हिंदुत्ववादी रस्त्यांवर, एकबोटेंच्या घरावर मोर्चा

भीमा-कोरेगाव प्रकरणी बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’दरम्यान आंदोलकांनी मुंबईत गोरेगाव येथे रेल्वेवाहतूक बंद पाडली. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावर ठिकठिकाणी आंदोलनामुळे हजारो प्रवासी अडकून पडले होते.

‘बंद’मुळे रेल्वे आणि रस्तावाहतूक कोलमडली, कोल्हापूर, सांगलीत हिंदुत्ववादी रस्त्यांवर, एकबोटेंच्या घरावर मोर्चा

भीमा-कोरेगाव प्रकरणावरून निर्माण झालेल्या असंतोषाला बुधवारी पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ने वाट मिळून हा उद्रेक शमला असला तरी समाजमन मात्र दुभंगत चालल्याचे वास्तव समोर आले आहे. बंदकाळात मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत रास्तारोको, रेल्वेरोको, एसटी बसगाडय़ांची आणि वाहनांची तोडफोड, दगडफेक असे हिंसक प्रकार घडले. मुंबईची जीवनवाहिनी असलेली रेल्वेसेवा आणि त्यापाठोपाठ रस्तावाहतूकही पुरती कोलमडली.

कोल्हापूर आणि सांगलीत आंदोलक आणि विरोधक आमनेसामने आल्याने तणाव कमालीचा वाढला होता. पुण्यात हिंदु एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या घरावर आंदोलकांनी मोर्चा काढला तर केजमध्ये भाजप आमदार संगीता ठोंबरे यांच्या घरावर दगडफेक झाली. अनेक ठिकाणी पोलिसांवर दगडफेक झाली तसेच पोलिसांच्या वाहनाची तोडफोडही झाली. त्यात मुंबईत ३० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. संसदेतही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आणि या संवेदनशील प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मौन बाळगत असल्याबद्दल काँग्रेसने त्यांची संभावना ‘मौनीबाबा’ म्हणून केली.

चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी या मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये बंदचा सर्वाधिक प्रभाव जाणवला. चेंबूरमध्ये संतप्त आंदोलकांनी खासगी वाहनेही फोडली. त्यावरून स्थानिक रहिवासी आणि आंदोलकांमध्ये वादंग झडले. मुंबई पोलिसांनी बुधवारी शहरभरात सुमारे दीडशे आंदोलकांना ताब्यात घेतले. ज्या ठिकाणी दगडफेक, तोडफोडीचे प्रसंग घडले त्याबद्दल स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी नऊ गुन्हे दाखल झाले असून बुधवारी तोडफोडप्रकरणी सहा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आधीच तोटय़ात असलेल्या बेस्ट आणि एसटीचा या आंदोलनामुळे कणा मोडल्याचे सांगितले जात आहे.

शाळकरी मुलाचा मृत्यू

नांदेड जिल्ह्य़ातील हिमायतनगरमध्ये तणावाची परिस्थिती असल्याने धडक कृती दलाचे वाहन हदगावहून आष्टीमार्गे जात होते. जमावाने हे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. या वेळी वाहनातील जवानांनी खाली उतरून लाठीमार केला. या वेळी योगेश जाधव या दहावीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला. मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण उशिरापर्यंत समजले नाही. याच तालुक्यात एका मोटारीवर झालेल्या दगडफेकीत एक लहान मुलगी जखमी झाली आहे. परभणी येथील रा. स्व. संघाच्या कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न झाला, तर हिंगोलीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

दोन गट आमनेसामने

कोल्हापुरात बंद सुरू होताच आंदोलकांनी शहराच्या अनेक भागात बंद दुकाने, वाहनांची तोडफोड केली. अनेक घरे आणि दुकानांवरही दगडफेक केली. जमावाने केलेल्या दगडफेकीत आठ पोलीस जखमी झाले. जमावाच्या या हिंसक कृत्यानंतर लगोलग हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिमोर्चा काढल्याने शहरातील वातावरण तणावाचे बनले होते. या जमावाकडून दलित आंदोलकांच्या वाहनांवर हल्ला चढवण्यात आला.

सांगलीतही सकाळी शांततेत सुरू झालेल्या बंदला शिवप्रतिष्ठानचे प्रणेते संभाजी भिडे यांच्या पोस्टरवरील दगडफेकीनंतर  हिंसक वळण लागले. या घटनेनंतर दोन्ही समाज समोरासमोर आले. पोलिसांनी ही परिस्थिती अत्यंत संयमाने हाताळली गणपती मंदिराजवळील दुकानांवरील हल्ला आणि आणि भिडे गुरुजींच्या फलकावर दगडफेक करणाऱ्यांवर दोन दिवसांत कारवाई करण्याची मागणी शिवप्रतिष्ठानने केली आहे. शहरात दोन्ही गट आक्रमक झाल्याने पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली असली तरी अद्याप तणाव कायम आहे. सातारा, कराडमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. मंगळवारी कराड आणि ओगलेवाडी येथे झालेल्या दगडफेक व तोडफोडप्रकरणी पोलिसांनी शंभरावर अज्ञात व्यक्तींवर कराड शहर पोलिसात गुन्हे दाखल केले.

औरंगाबाद शहरातील आंबेडकर नगर भागात जमावाने पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे यांच्यासह दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  औरंगाबाद शहरातील तणावाची स्थिती लक्षात घेता मंगळवारी मध्यरात्रीपासून ‘इंटरनेट सेवा’ बंद करण्यात आली होती. मराठवाडय़ात सर्वत्र पोलीस गाडय़ांना लक्ष्य करून दगडफेकीचे प्रकार झाल्याचे दिसून आले.

मेवाणींविरोधातील अर्जाची पडताळणी

पुण्यातील कथित भडक भाषणप्रकरणी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असली तरी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. त्या भाषणाची ध्वनीचित्रफित तपासली जात असून पडताळणीनंतरच गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे समजते.

सलोख्याची बैठक

भीमा-कोरेगाव येथे मराठा आणि बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत गावात एकोपा राखावा आणि विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांचे स्वागत करावे, असा निर्णय घेतला आहे. दंगलीत कोणताही संबंध नसताना गावाचे नाव बदनाम होत आहे. बाहेरच्या लोकांकडून ग्रामस्थांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशा मागण्याही बैठकीत केल्या गेल्या.

स्वरूपात मिळाले पाहिजे, अशी मागणी बैठकीत स्थानिकांनी केली.   विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षर रमेश गलांडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी ही बैठक झाली होती. या बैठकीतील चर्चा आणि निर्णयानुसार बुधवारी भीमा कोरेगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन एकोप्याची ग्वाही दिली. दंगलीत कोरेगाव ग्रामस्थांचा कोणताही संबंध नसताना गावाचे नाव बदनाम होत आहे. बाहेरच्या लोकांकडून स्थानिक ग्रामस्थांचे झालेले नुकसान भरपाई स्वरूपात मिळाले पाहिजे, अशी मागणी बैठकीत स्थानिकांनी केली.

भिडे, एकबोटेंसह ग्रामस्थांवर गुन्हा दाखल

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह भीमा-कोरेगाव येथील ग्रामस्थांविरुद्ध येरवडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भटक्या विमुक्त जात जमाती संघटनेच्या सरचिटणीस सुषमा अंधारे यांनी या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संभाजी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटे आणि भीमा-कोरेगावमधील रहिवासी योगेश गव्हाणे, गणेश फडतरे यांच्यासह एक हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘बंद’चा फटका..

  • रेल्वे, मेट्रो आणि रस्तेही रोखले : मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा तसेच मेट्रो आणि पूर्व द्रुतगती मार्ग, पूर्व मुक्त मार्ग बंद पाडून आंदोलकांनी रेल्वे आणि रस्ता वाहतूक रोखून धरली. बेस्टच्या बस, रिक्षा, टॅक्सी अनेक ठिकाणी रोखण्यात आल्या तर काही ठिकाणी चाकातील हवा काढली गेली.
  • विमानसेवा अधांतरी : मुंबई विमानतळावरील विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. काही उड्डाणे रद्द करावी लागली, तर २३५ उड्डाणांना विलंब झाला, असे अनधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. जेट एअरवेजच्या ३२ फेऱ्यांना बंदचा फटका बसला, तर इंडिगोची एक सेवा रद्द करावी लागली.
  • चित्रिकरणे बारगळली : बंदमुळे काही चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांची चित्रिकरणे बारगळली. ‘कुंडली भाग्य’ आणि ‘ऐसी दिवानगी देखी नही कभी’ या झी वाहिनीच्या मालिकांचे अंधेरी आणि जोगेश्वरी येथे होणार असलेले चित्रिकरण रद्द करावे लागले.

First Published on January 4, 2018 2:31 am

Web Title: maharashtra violence and the battle of bhima koregaon part 2