News Flash

११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू, पण ‘सर्व्हर डाउन’मुळे विद्यार्थी-पालक झाले हैराण

'सर्व्हर डाउन'च्या समस्येचा सामना...

(प्रतिकात्मक छायाचित्र )

दहावीच्या निकालानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने तातडीने अकरावी प्रवेश प्रक्रियेला शनिवारपासून सुरुवात केली. शनिवारी दुपारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.

पण, वेबसाइट सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात सर्व्हर डाउनच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी काही पालकांनी केल्या आहेत. पुणे मिररने याबाबतचं वृत्त दिलं आहे. अर्ज भरताना संकेतस्थळ कासवगतीने सुरू होते असं काही पालकांचं म्हणणं आहे. अनेकदा प्रयत्न केल्यानंतरच यशस्वीपणे लॉग-इन होत असल्याची तक्रार काही विद्यार्थी-पालकांनी जणांनी केली आहे. दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी शनिवारी सायंकाळपर्यंत १ लाख ९२ हजार २४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील १ हजार ३२४ विद्यार्थ्यांचे अर्ज निश्चित झाले आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई एमएमआर क्षेत्र आणि राज्यातील सहा महापालिका क्षेत्रातील तब्बल १ हजार ६०० कॉलेजांमधील तब्बल साडे पाच लाख जागासाठीची प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना घरबसल्या करता यावी यासाठी संकेतस्थळात यंदा काही बदल करण्यात आले आहेत. अर्जाचा पहिला भाग भरणे, कागदपत्रांची पडताळणी करणे, माहिती भरून अर्ज लॉक करणे, महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे, प्रवेश निश्चित करणे या प्रकारच्या सर्व प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीनेच संकेतस्थळाद्वारे विद्यार्थ्यांना पार पाडता येतील. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना माहितीपुस्तकेही ऑनलाइन मिळणार असून त्याचे शुल्कही कमी करण्यात आहे. यंदा २२५ रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना माहितीपुस्तक उपलब्ध करून देण्यात येईल. माहितीपुस्तकात महाविद्यालयांसंबंधात तसेच, प्रवेश प्रक्रियेचे टप्पे, नियम, प्रक्रिया कशी करावी, अर्ज, महाविद्यालयांचे पात्रता गुण (कट ऑफ) आदी माहिती मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 1:37 pm

Web Title: maharashtra website of class xi admission crashes soon after going live sas 89
Next Stories
1 शरद पवारांची भावूक पोस्ट, राजेश टोपेंच्या कुटुंबीयांबद्दलच्या आठवणींना दिला उजाळा
2 चंद्रपूरमध्ये पिकअप चालकाचं नियंत्रण सुटलं, अंगणात खेळणाऱ्या तीन चिमुकल्यांना चिरडलं
3 राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या ९ हजार ५६६ वर
Just Now!
X