विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्य़ातील ११ जागांकरिता दाखल झालेल्या ४०३ उमेदवारांच्या अर्जाची छाननी सोमवारी होऊन यात जवळपास सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत वैध अर्जाचा अधिकृत तपशील जाहीर झाला नव्हता.
दरम्यान, सायंकाळी पाचपर्यंत अक्कलकोट, बार्शी व करमाळा या तीन विधानसभा मतदारसंघातील वैध उमेदवारांची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली. अक्कलकोटमध्ये भाजपचे आमदार सिद्रामप्पा पाटील, काँग्रेसचे सिध्दाराम म्हेत्रे, शिवसेनेचे मनोज पवार, मनसेचे फारूख शाब्दी, राष्ट्रवादीचे दिलीप सिध्दे, बसपाचे चंद्रकांत इंगळे, एमआयएमचे सुभाष शिंदे आदींसह २५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर बार्शीत राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल व काँग्रेसचे राजेंद्र राऊत यांच्यासह शिवसेनेचे राजेंद्र मिरगणे, काँग्रेसचे सुधीर गाढवे, बसपाचे गणेश शिंदे यांच्यासह १७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. एका अपक्षाचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. करमाळा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या रश्मी बागल, काँग्रेसचे जयवंत जगताप, शिवसेनेचे नारायण पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय शिंदे, मनसेचे जालिंदर जाधव, बसपाचे रोहिदास कांबळे यांच्यासह सर्व २० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
सोलापूर शहर मध्यमध्ये भाजपच्या उमेदवार प्रा.मोहिनी पत्की यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील माहितीबाबत काही उमेदवारांनी हरकत घेतली होती. परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही हरकत फेटाळून प्रा. पत्की यांचा अर्ज वैध ठरविला.याठिकाणी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे व सेनेचे महेश कोठे यांच्यासह जवळपास सर्व उमेदवारी अर्ज मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. तर सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजपचे आमदार विजय देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते, सेनेचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्यासह जवळपास सर्व उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले. सोलापूर दक्षिण, पंढरपूर, माढा, मोहोळ, माळशिरस या मतदारसंघातील उमेदवारी अर्जाच्या छाननीची तपशील समजू शकला नाही. मात्र प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.