मुलीची विदर्भातून सुटका

कर्जत: ‘फ्री फायर गेम खेळणे’ आता धोकादायक झाले असून मोबाइलच्या वापराचे अनेक दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत.  एकत्र ऑनलाइन गेम खेळण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून  घेऊन जाणाऱ्या मुलास कर्जत पोलिसांकडून विदर्भातील बाळापूर (जिल्हा अकोले) येथून अटक करीत  ३ दिवसात पीडित मुलीची सुटका केली.

या बाबत घडलेली घटना अशी,की २० मार्च  रोजी सदर अल्पवयीन मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाल्याचे आई—वडिलांच्या लक्षात आले. परिसरात शोध घेतलाअसता ती सापडली नाही. त्यानंतर कर्जत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.

कर्जत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर  पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी जवान गणेश ठोंबरे, तुळशीदास सातपुते यांची नेमणूक तपास कामासाठी केली.

पूर्वी फेसबुक च्या माध्यमातून मैत्री करून मुलींना किंवा महिलांना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना घडत असताना आता आणखी नवीन प्रकार समोर आला आहे. त्यात ऑनलाइन गेम जोडीदार शोधून खेळला जात आहे आणि यामध्ये कोणताही फोन कॉल न करता देखील  फसवणूक करण्याच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. यामुळे आता पालकांना आणखी सतर्क राहावे लागणार आहे.

आरोपीने दिली खोटी माहिती

तपासात आरोपीला माहिती विचारली असता माझे लग्न ठरले आहे, साखरपुडा झाला आहे, अशी माहिती देऊन दिशाभूल करण्याच्या उद्देशाने दुसऱ्याच मुलीसोबत तयार केलेला बनावट फोटो पाठवून दिला.

कर्जत पोलिसांचे कौतुक.

कोणताही पुरावा नसताना कर्जत पोलिसांनी मुलीला शोधून आणल्याने कर्जत पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, राशीन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार तुळसीदास सातपुते, गणेश ठोंबरे, मोबाइल सेलचे नितीन शिंदे, मारुती काळे, सागर म्हेत्रे, बळीराम काकडे, गणेश भागडे, संपत शिंदे यांनी केली

गेमवरून शोध

काही मुलं आणि मुली ऑनलाइन ‘फ्री फायर गेम’ खेळत होती.  अल्पवयीन मुलगी व हा फसवणूक करणारा मुलगा ऑनलाइन एकत्र गेम खेळत असल्याचे लक्षात आले. या नंतर गोपनीय आणि तांत्रिक माहितीवरून बाळापूर, जिल्हा—अकोला येथे सदर पीडित मुलगी असू शकते अशी माहिती मिळाली. तत्काळ सदर ठिकाणी पोलीस अधिकारी रवाना केले. रात्री ०३.३० च्या दरम्यान आरोपी  मिथुन पुंडलिक दामोदर,( वय २४ वर्ष रा . सगद ता . बाळापुर जि. अकोला) याचे घरून मुलीला आणि आरोपीस ताब्यात घेऊन कर्जत येथे आणले गेले.

बहिणीची फसवणूक

फ्री फायरमधील  आरोपी मुलाची प्रथम मुलीच्या भावाशी ऑनलाइन ओळख झाली. आरोपीने मुलीच्या भावाला प्रथम ३००० रु. चा गेम रिचार्ज करून दिला.  तो त्या मुलांसोबत खेळू लागला. काही दिवसात मुलाच्या बहिणीबरोबर सुद्धा फ्री फायर गेम खेळू लागला. मुलीशी जास्त बोलणे सुरू झाले. गेम मध्येच बोलणे, मेसेज सुरू होते. मुलगी वयाने लहान असल्याने तिच्या लक्षात आले नाही, तिचे अपहरण करण्यात आले.