अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरावर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या तरंगत्या जेटीचे काम रखडले आहे. मार्च २०१५ मध्ये झालेल्या अपघातात ही तरंगती जेटी मांडवा येथून हलविण्यात आली. वर्ष झाले तरी तरी ही जेटी अद्याप पुन्हा बसविण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पावणे चार कोटी रुपयांच्या या तरंगत्या जेटीच्या भवितव्याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
गेल्या काही वर्षांंत अलिबाग हे मुंबई जवळील महत्वाचे पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला आले आहे. त्यामुळे मुंबईच्योसमोरच असलेल्या मांडवा जेटी येथून दरवर्षी लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. कोकणातील सर्वाधिक प्रवासी वाहतुक करणारे बंदर म्हणूनही मांडवा नावारुपाला आले आहे. येथे येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मांडवा जेटी विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मांडवा जेटीवरून ये -जा करणाऱ्या बोटींसाठी येथे तरंगती जेटी अर्थात फ्लोटींग प्लाटून उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षी इथे नव्याने उभारण्यात आलेल्या या तरंगत्या जेटीला उद्घाटनापुर्वीच अपघात झाला होता. आणि जेटी कलंडली होती. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. या अपघातानंतर ही जेट्टी येथून हलविण्यात आली. मात्र वर्ष उलटून गेले तरी पुन्हा बसविण्यात आली नाही.
पावणेचार कोटी रूपयांच्या या तरंगत्या जेटीचे काम ओशियन ब्लू या कंपनीला देण्यात आले होते. आता ही जेट्टी सध्या कोठे आहे, ती पुन्हा कार्यान्वित होणार आहे का? या जेट्टीच्या कामाचे पावणेचार कोटी रूपयांचे बील घेतलेल्या ओशीयन ब्लु कंपनीवर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने काय कारवाई केली? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
याबाबत काही स्थानिकांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्याची मेरीटाईम बोर्डाने दखलही घेतली नाही. माहितीच्या अधिकारात माहिती मागवूनही ती देण्यात येत नसल्याने आता जेटी गेली कुठे आहे? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे.
ही जेट्टी मांडवा येथे उपलब्धच नसल्याने जनतेला काडीमात्र उपयोग झालेला नाही. सन २०१२ मध्ये मंजूर झालेली ही जेट्टी २०१६चा जलवाहतुकीचा हंगाम संपत आला तरी प्रवाशांच्या दृष्टीक्षेपात पडलेली नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमताने सरकारच्या कोटय़वधी रूपयांचा चुराडा केल्याची माहिती अधिकार कार्यकत्रे संजय सावंत यांनी दिली आहे त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात मेरीटाईम बोर्डाचे बंदर निरीक्षक कॅ. सी . जे . लेपांडे यांच्याशी संपर्क साधला असता ही जेटी कलंडल्यानंतर दुरूस्तीसाठी नेण्यात आली आहे. मजबुतीसाठी त्या ठिकाणी आणखी ६ नवीन खांब उभारले जाणार आहेत. असेही त्यांनी स्पष्ट केले.