मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबादमध्ये मुकुंदवाडी परिसरात रेल्वेखाली उडी मारून प्रमोद होरे-पाटील या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान प्रमोद होरे-पाटील याच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत आणि पात्रतेनुसार कुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली जाईल असं लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे. तर, प्रमोद पाटीलच्या आत्महत्येचं वृत्त समोर आल्यानंतर मुकुंदवाडीतील, रास्ता रोको, बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. औरंगाबाद- जालना मार्ग बंद झाला आहे. या भागातील वातावरण तणावपूर्ण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

प्रमोद पाटील हा स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. मात्र आरक्षण नसल्याने तयारी करून देखील समाज बांधवांना संधी मिळत नाही यामुळे तो नाराज झाला होता. अखेर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपला जीव देत असल्याचे त्याने फेसबुकवर फोटो पोस्टमधून जाहीर केले होते. मराठा आरक्षणासंदर्भात रविवारी (29 जुलै) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक पोस्ट टाकली होती. ‘चला आज एक मराठा जातोय… पण काही तरी करा… मराठा आरक्षणासाठी करा… जय जिजाऊ… आपला प्रमोद पाटील…’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. तर दुसरी पोस्ट 4.50 वाजता पोस्ट करत त्यात मराठा आरक्षण जीव जाणार असे नमूद केले होते. दुसरी पोस्ट टाकतेवेळी रेल्वे रुळावर सेल्फी काढला होता. अखेर मध्य रात्री मुकुंदवाडी भागात धावत्या रेल्वेखाली उडी घेत त्याने आत्महत्या केली, असे पोलीस तपासात समोर आले आहे.

रविवारी संध्याकाळी ‘मराठा आरक्षण जीव जाणार’ असं कॅप्शन टाकून त्याने रेल्वे रुळाजवळ उभा असतानाचा फोटो फेसबुकवर एक पोस्ट केला होता. त्यानंतर त्याच्या मित्र-मैत्रिणींनी फेसबुकवर त्याची पोस्ट पाहिली आणि त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली असता रात्री त्याने मुकुंदवाडी रेल्वेस्थानकात रेल्वेखाली उडी मारून जीव दिल्याचं उघड झालं. आत्महत्येपूर्वी प्रमोदने काही मित्रांना टॅग करत आणखी एक पोस्ट टाकली होती. ‘चला आज एक मराठा जातोय… पण काही तरी मराठा आरक्षणासाठी करा…प्रमोद पाटील मराठा आरक्षणाचा चौथा बळी,’ असं त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं होतं .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.