मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील मराठा संघटनांचे आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरुच असून गुरुवारी मावळ, सिंधुदुर्ग, सोलापूरमधील बार्शी येथे आंदोलनाचे पडसाद उमटले. मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत महामार्गावरील वाहतूक रोखली. तर सिंधुदुर्गमध्येही बंदची हाक देण्यात आली आहे.

मराठा समाजास आरक्षण द्यावे तसेच आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत सरकारने जाहीर केलेली ७२ हजार जागांवरील नोकरभरती स्थगित करावी व अन्य मागण्यांसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यात सोमवारी काकासाहेब शिंदे या आंदोलकाने जलसमाधी घेतल्याने आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले. मंगळवारी महाराष्ट्र बंद आणि बुधवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई बंदची हाक देण्यात आली होती.

गुरुवारीही राज्यातील काही भागांमध्ये बंदची हाक देण्यात आली. मावळ, सिंधुदुर्ग, सोलापूरमधील बार्शी, नाशिकमधील येवला येथे बंदची हाक देण्यात आली. मावळमध्ये सोमाटने, कान्हे फाटा, कामशेत येथे आंदोलकांनी मुंबई- पुणे महामार्गावर आंदोलन केले. तळेगाव दाभाडे येथे आंदोलकांनी जवळपास अर्धा तास जुन्या महामार्गावरील वाहतूक रोखली. तर मळवली स्टेशन येथे आंदोलकांनी भुसावळ-मनमाड एक्स्प्रेस अडवली. जवळपास १५ मिनिटे आंदोलक रुळावर ठाण मांडून होते. अखेर पोलिसांनी या आंदोलकांना हटवले आणि या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली. मावळ तालुक्यातील बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पिंपरी-चिंचवड (निगडी) येथील भक्ती शक्ती चौक आणि लोणावळयातून वाहतूक वळवली आहे.

सोलापूरमधील बार्शी, नाशिकमधील येवला येथेही आज बंद असून सिंधुदुर्गातही बंदची हाक देण्यात आली. सिंधुदुर्गातही आंदोलकांनी महामार्गावरील वाहतूक रोखली. बंदच्या पार्श्वभूमीवर संबंधित शहरांमध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला.

 

मराठा आरक्षण मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यात बार्शी येथे बंद दरम्यान आंदोलकांनी एसटी जाळली. सोलापूर – हैदराबाद महामार्गावर बोरामणी येथे ग्रामस्थांनी चक्का जाम आंदोलन केले.

दुसरीकडे औरंगाबाद पोलिसांनी बंददरम्यान पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ३० ते ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाण्यातही आंदोलकांवर कारवाई केली जात आहे.