मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबादजवळील कायगाव टोक येथे एका तरुणाने पुलावरुन नदीत उडी मारल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. काकासाहेब दत्तात्रय शिंदे असे या तरुणाचे नाव असून त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला.

गंगापूर तालुक्यातील कानडगावात राहणारा काकासाहेब शिंदे (वय २७) हा  तरुण मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झाला होता. सोमवारी दुपारी  कायगाव टोक येथील गोदावरी नदीवरील पुलावरुन त्याने उडी मारली. स्थानिक पोलिसांनी तातडीने काकासाहेब शिंदेला पाण्याबाहेर काढले. त्याची रवानगी रुग्णालयात करण्यात आली असून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा जलसमाधी घेऊ, असे त्याने उडी मारण्यापूर्वी म्हटले होते. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

गंगापूर तहसील कार्यालयासमोर शेकडो तरुणांचे ठिय्या व उपोषण आंदोलन सुरु आहे. मात्र, हे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करत सोमवारी दुपारी मराठी समाजाच्या वतीने ‘जलसमाधी’ आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनादरम्यान ही घटना घडली आहे.  आंदोलकांनी जलसमाधीसारखे आंदोलन करु नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

काकासाहेब शिंदे या तरुणाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच गंगापूर पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमा झाला. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मराठवाड्यात मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरुच असून उस्मानाबादमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात ठिय्या आंदोलन करण्यात आले. संध्याकाळी स्वयंवर मंगल कार्यालयात मराठा समाजाची बैठक होणार असून या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. जालना शहरात उद्या तिरडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी शहरातील सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवली जाणार आहेत. गुरुवारी जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. नांदेडमधील उमरी येथेही मंगळवारी बंदची हाक देण्यात आली आहे.