प्रवचनकार जीवनाला दिशा देण्याचं काम करतो, प्रवचनातून तो आयुष्य जगण्याचं सार शिकवतो. योग्य-अयोग्य, चांगल-वाईट यातला फरक समजावतो. पण भंडारा तालुक्यात एका प्रवचनकार याला अपवाद ठरला आहे. त्याने त्याच्या शब्दांच्या बिलकुल उलट कृती करत, सर्वांनाच धक्का दिला. भागवत सप्ताहासाठी गावात आलेल्या या महाराजाने विवाहित महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळयात ओढले व तिला पळवून नेले. भंडारा तालुक्यातील मोहदूरा येथे बुधवारी ही घटना घडली. टीव्ही ९ मराठीने हे वृत्त दिले आहे.

महिलेशी ओळख कशी झाली?
मोहदूरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही २७ जानेवारी ते तीन फ्रेब्रुवारीपर्यंत भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी नागपूर जिल्ह्यातून तरुण महाराजाला बोलवण्यात आले होते. हा महाराज मागच्यावर्षी सुद्धा मोहदूरामध्ये आला होता. त्याचवेळी तो महिलेच्या संपर्कात आला व दोघांमध्ये प्रेमसंबंधांची सुरुवात झाली. आपल्या मधाळ बोलण्याने त्याने विवाहितेला आपल्या जाळयात ओढले.

यंदा २७ जानेवारी ते तीन फेब्रुवारी या काळात त्याचे नियमित प्रवचन सुरु होते. गावातील लोकांना उदाहरणांमधून अध्यात्माची शिकवण देताना हा महाराज स्वत: प्रेमाचे धडे गिरवत होता. तीन फेब्रुवारीला सप्ताह संपल्यानंतर तो आपल्या गावी निघून गेला. तो पर्यंत सर्व सुरळीत होते. पाच फेब्रुवारीला त्याचा एक माणूस दुचाकीवरुन गावात आला. महिलेच्या दारासमोर त्याने दुचाकी थांबवली. महिला घरातून बाहेर आली व दुचाकीवर बसून निघून गेली.

महिलेच्या घरी मुक्कामही केला
महिलेशी ओळख झाल्यानंतर या महाराजाने तिच्या कुटुंबियांनाही गोड बोलून फसवलं. या महाराजाने त्यांच्या घरी मुक्कामही केला होता. एकूणच गावकरी त्याच्या गोड बोलण्यामध्ये फसले होते. त्यामुळे यावर्षी सुद्धा भागवत सप्ताहासाठी त्यालाच बोलावले होते.

महिला घरातून पळून गेल्यानंतर पती आणि सासऱ्यांना दोघांच्या संबंधांची कल्पना होती. त्यामुळे त्यांनी भंडारा पोलीस ठाण्यात या महाराजाविरोधात तक्रार नोंदवली. महाराजासोबत पळून गेलेल्या या महिलेला एक मुलगी सुद्धा आहे. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत. पण मोबाइल बंद असल्यामुळे त्यांचे लोकेशन सापडत नाहीय. या महाराजाची यापूर्वी सुद्धा लग्ने झाली आहेत. पण याच स्वभावामुळे त्याला त्याच्या बायका सोडून गेल्याची माहिती आहे.