प्रदीप नणंदकर

‘कष्टेविन फळ नाही, केल्याविन होत नाही साध्य काही’ असे समर्थ रामदासांनी सांगितले आहे. आपल्या सभोवताली पाहिल्यानंतर जी मंडळी मोठी झाली आहेत त्यांच्यामागे कष्ट आहेत व कष्टानेच असाध्य गोष्ट ते साध्य करू शकले याची अनेक उदाहरणे ऐकिवात आहेत.

लातूरचे नवनिर्वाचित खासदार सुधाकर तुकाराम श्रुंगारे यांचा केवळ दोन वर्षांपूर्वी राजकारणाशी संबंध आला. तोपर्यंत आपले काम भले व आपला व्यवसाय भला या पद्धतीने कामावर निष्ठा ठेवून ते काम करत असत. २०१७ साली जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ राखीव गटातून जिल्हा परिषदेचे तिकीट त्यांना देण्यात आले व तालुक्यात सर्वाधिक मताने ते विजयी झाले. त्यानंतर त्यांनी राजकीय महत्त्वाकांक्षा मनात ठेवून कामाची आखणी केली व जिल्हाभर संपर्क ठेवला. त्यावेळचे खासदार सुनील गायकवाड यांचा दबदबा होता. संसदेतील त्यांची कामगिरीही चांगली होती. त्या स्थितीत आपल्याला खासदार व्हायचे आहे ही इच्छा मनात दडवून न ठेवता त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला. अनेक लोकांशी संपर्क ठेवला व तो वाढवत नेला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुधाकर श्रुंगारे यांनी सुनील गायकवाड यांचा विक्रम मोडीत काढत सहाही विधानसभा मतदारसंघात तब्बल एकूण दोन लाख ८९ हजार १११ अधिक मते घेऊन त्यांनी विजय संपादन केला.

सुधाकर श्रुंगारे हे चाकूर तालुक्यातील घरणी या गावचे रहिवासी. १९६२ साली त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी उदगीर गाठले. घरची परिस्थिती अतिशय बेताची, त्यामुळे शिक्षण फारसे घेता आले नाही. बारावीत शिकत असतानाच त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर  करावे लागले. ओळखीच्या लोकांकडून पत्ता घेत मजुरीसाठी त्यांनी थेट कर्नाटकची राजधानी बंगळुरू गाठले. तेथे काहीकाळ मजुरी केली व त्यानंतर ते पुणे येथे आले. प्रारंभी मजुरी, त्यानंतर मजुरीचे कंत्राट, नंतर बांधकाम गुत्तेदार या टप्प्याने त्यांनी व्यवसायात जम बसवण्यास सुरुवात केली व पाहता पाहता आपल्या परिश्रमाच्या जोरावर काही वर्षांतच ते पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जाऊ लागले. व्यवसायात मिळणारा पसा, मान- मरातब हाही त्यांच्याकडे चालून आला.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वडवळ भागातील ग्रामस्थांनी सुधाकर श्रुंगारे यांना गावाकडे येऊन जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. त्यांचा गावाशीही संपर्क होता. त्यातून ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभे राहिले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी मतदारसंघातील सर्व गावे पिंजून काढली. त्यादरम्यान राजकारणाचा चांगला अभ्यास केला. खाचखळगे जाणून घेतले व ते मोठय़ा मताधिक्क्याने विजयी झाले.

जिल्हय़ातील सर्व विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी सहभाग नोंदवला. लोकांशी जवळीक साधली, त्यामुळे पक्षातील सर्वच विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून त्यांच्या नावाला पसंती मिळाली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही एकमुखी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, त्यामुळेच पक्षश्रेष्ठींनी त्यांना उमेदवारी जाहीर केली.

उमेदवारी जाहीर केल्यानंतर कोणत्याही चच्रेत न अडकता प्रामुख्याने मतदारांशी संपर्क करण्यावरच त्यांनी भर दिला व दररोज सुमारे १५ गावात सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते भेटीगाठी घेत होते. मोदी नावाचा करिष्मा सोबत असल्याने आपला विजय होणार याची त्यांना मनोमन खात्री होती. लातूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, लातूररोड ते गुलबर्गा नवी रेल्वेलाईन यासह अनेक प्रश्न मार्गी लावण्याची मी ठरवले आहे, पण त्यावर अधिक भाष्य न करता पहिल्यांदा ते प्रश्न मार्गी लागावेत यासाठी आपण पाठपुरावा करू, प्रश्न मार्गी लावू, अशा शब्दात श्रुंगारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मी फर्डा वक्ता नाही. जास्त शिकलेलो नाही. मात्र , माणसे अधिक वाचली आहेत. त्यामुळे लोकांची गरज काय आहे याची आपल्याला जाणीव आहे. आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीत आपण लोकात मिळूनमिसळून वागू. निवडणुकीपूर्वी जसे कपडे वापरत होतो तसेच कपडे माझ्या अंगावर राहतील. खासदार झालो म्हणजे मला काही शिंगे फुटलेली नाहीत, याची मला जाणीव आहे, असेही श्रुंगारे सांगतात.