News Flash

रुग्णांच्या मदतीसाठी आमदाराचा मुक्काम करोना केंद्रातच!

११०० खाटांच्या भाळवणी येथील कोविड उपचार केंद्रात १०० खाटांना प्राणवायूची सुविधा आहे.

रुग्णांचे मनोरंजन करताना जादूगार

|| संजय वाघमारे

पारनेर: करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्येबरोबरच मानसिक, सामाजिक, आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या विविध समस्यांचे निराकरण भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात (कोविड उपचार केंद्र) केले जाते. त्यासाठी पारनेर-नगरचे आमदार नीलेश लंके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते अहोरात्र कष्ट घेत आहेत. आमदार लंकेनी कोविड उपचार केंद्रात मुक्काम ठोकला आहे.

११०० खाटांच्या भाळवणी येथील कोविड उपचार केंद्रात १०० खाटांना प्राणवायूची सुविधा आहे. करोना संसर्गाची सामान्य लक्षणे असणाऱ्या तसेच प्राथमिक पातळीवर प्राणवायूची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांवर या ठिकाणी उपचार केले जातात. आवश्यकता भासल्यास रुग्णांना पुढील उपचारासाठी संसर्गाच्या तीव्रतेनुसार पारनेर ग्रामीण रुग्णालय, बूथ रुग्णालय (नगर), जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच आवश्यकतेनुसार खासगी रुग्णालयात पाठवण्यात येते.

भाळवणी येथील कोविड उपचार केंद्र पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाबरोबरच नगर, पुणे जिल्ह्यातील जनतेसाठी आधार केंद्र ठरले आहे. प्राथमिक अवस्थेतील संसर्ग झालेल्या रुग्णाला इतरत्र रुग्णालयात जागा मिळाली नाही तरी भाळवणी येथील कोविड उपचार केंद्रात हमखास मिळणार याची खात्री असते. कोणतीही चौकशी न करता रुग्ण थेट भाळवणी येथील उपचार केंद्रात दाखल होतात.

या उपचार केंद्रात सरासरी ९०० रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णाची प्राणवायूची, तपमानाची तपासणी करण्यास मदत करतात.या दरम्यान रुग्णांच्या, कुटुंबीयांच्या अडचणी विषयी चौकशी सुरू असते. काही अडचणी असतील तर कार्यकत्र्यांमार्फत सोडवण्यात येतात. आपला आमदार आपल्याबरोबर २४ तास असल्याने रुग्णांना मोठा मानसिक आधार मिळतो. त्यातूनच रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होते. गेल्या महिनाभरात २७४३ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

रुग्णांना मानसिक आधार

रुग्णांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी पहाटे उपचार केंद्रात प्राणायाम, योगासने आणि हलके व्यायाम करून घेतले जातात. आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रुग्णांना प्रथिनयुक्त आहार दिला जातो. सकाळी न्याहरीत काढा, अंडी, फळे दिली जातात.एकवेळच्या जेवणात मांसाहार दिला जातो. रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रथिनयुक्त आहाराबरोबरच फळे, हळदीचे दूध रुग्णांना दिले जाते.

दररोज संध्याकाळी प्रवचन, वाद्यवृंद, जादूचे प्रयोग यापैकी एखाद्या धार्मिक अथवा मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. एका बाजूला करोना संसर्गाच्या पाश्र्वाभूमीवर सर्वत्र दहशतीचे, भीतीचे वातावरण असताना भाळवणी येथील उपचार केंद्रात उत्सवी वातावरण अनुभवायला मिळते.

करोनासदृश लक्षणे असणाऱ्या व गृहविलगीकरणात राहून खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णाला किमान २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो तर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना दीड लाख रुपये खर्च येतो. या पाश्र्र्वाभूमीवर असताना आमदार लंके यांच्या उपचार केंद्रात एक रुपयाही खर्च येत नाही.

सव्वा कोटी रुपयांची देणगी जमा

आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपचार केंद्राच्या मदतीसाठी हजारो हात सरसावले आहेत.गेल्या महिन्याभरात तब्बल १ कोटी २० लाख ३१३ रुपयांची देणगी जमा झाली आहे. धान्य, भाजीपाला, फळे, दूध, अंडी, किराणा याचा ओघ सुरूच आहे. वडनेर हवेली येथील जाणीव प्रतिष्ठानने दोन लाख रुपये खर्चाची जलशुद्धीकरण यंत्रणा उभारली आहे. भाळवणी येथील भुजबळ कुटुंबाने मंगल कार्यालय व आठ एकर जागा उपचार केंद्रांसाठी विनामोबदला उपलब्ध करून दिली आहे.

गेल्या वर्षी, संसर्गाच्या पहिल्या लाटेत,पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथे आमदार नीलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड उपचार केंद्रातून ४ हजार ६६८ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले.

संसर्गाच्या भीतीमुळे तसेच माझे व माझ्या कुटुंबीयांचे काय होईल असा विचार करून मी घरी बसलो तर माझ्या मतदारसंघातील जनतेला कोणी वाली राहणार नाही. माझ्यावर प्रेम करणारी मतदारसंघातील जनता हेच माझे कुटुंब आहे. माझे काहीही होवो, माझी जनता सुरक्षित राहिली पाहिजे ही माझी भूमिका आहे.  – नीलेश लंके, आमदार

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 12:03 am

Web Title: mla stays at the corona center to help the patients akp 94
Next Stories
1 अकोल्यातील ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयाची बोळवण
2 काँग्रेसचे माजी आमदाराच्या मुलाची कोविड केंद्रावरील डॉक्टरला मारहाण
3 “करोना संसर्ग आणि मराठा आरक्षण विषयावर विशेष संसदीय अधिवेशन बोलवावे”
Just Now!
X