संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक असणारे पत्रकार, समाजसुधारक, वक्ते केशव ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती. प्रबोधनकरांच्या जयंती निमित्त त्यांचे नातू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटवरुन एक फोटो ट्विट करुन त्यांच्या स्मृती विनम्र अभिवादन केले आहे.

प्रबोधनकारांचा एक फोटो ट्विट करत राज यांनी आपल्या आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था, आणि अस्पृश्यतेच्या विरोधात वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्र वापरून पुराणमतवाद्यांशी लढा देत समाजसुधारणांना पुढे नेणारे द्रष्टे समाजसुधारक, आमचे आजोबा स्व. प्रबोधनकार ठाकरे ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन,’ असं राज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. राज यांच्या या ट्विटवर अनेकांनी रिप्लाय करुन प्रबोधनकारांना अभिवादन केले आहे.

प्रबोधनकार ठाकरेंविषयी थोडक्यात
>

१७ सप्टेंबर १८८५ रोजी केशव ठाकरे यांचा रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्म झाला होता.
>
महात्मा फुले हे प्रबोधकारांचे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले.
>
अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून प्रबोधनकारांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला.
>
सामाजिक सुधारणा हेच प्रबोधनकारांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्र्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्र्न असो; ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले. त्यांच्या लढ्यापासून, तत्त्वांपासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेक आमिषे दाखविली पण प्रबोधनकारांनी कशालाही दाद दिली नाही.
>
मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी हुंडाप्रतिबंधक चळवळ हाती घेतली. सर्व जातींची हुंडाप्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन करून अनेक वरपित्यांना त्यांनी घेतलेल्या हुंड्याच्या रकमा परत देण्यास भाग पाडले. त्या काळी विवाहाआधी प्रेम करणे हा गुन्हा, व्यभिचार समजला जाई. अशा काळात त्यांनी अनेक प्रेमी युगुलांचे विवाह लावून दिले.
>
प्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला.
>
कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्‍तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे – अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली.
>
प्रबोधनकारांनी लिहीलेली ’खरा ब्राह्मण’ आणि ’टाकलेले पोर’ ही दोन्ही नाटके समाजसुधारणांसाठी क्रांतिकारकच ठरली. खरा ब्राम्हण या नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी मागणी पुण्यातील ब्राम्हणांनी न्यायालयाकडे केली असता, न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता.
>
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा लढा होता. या वेळी त्यांचे वयही बरेच झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी या चळवळीला नेतृत्व दिले, काही काळ कारावासही भोगला. ते कुशल संघटक असल्यानेच या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले.
>
प्रबोधनकार ठाकरे, प्रल्हाद केशव अत्रे आणि कॉम्रेड डांगे या तिघांनी खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्राची चळवळीला बळ दिले

(‘प्रबोधनकार ठाकरेंविषयी थोडक्यात’मधील सर्व मुद्दे विकीपिडीयावरून साभार)