राज्यात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यानं राज्य सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून अनेक गोष्टींवरील निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन सुरळीत होत असलं, तरी शहरातील परिस्थिती अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. त्यामुळे राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मनसेनं ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करून राज्य सरकारकडे विनंती केली आहे. नांदगावकर म्हणाले,”राज्य सरकारला आमची विनंती आहे की, त्यांनी आता पूर्ण राज्यात “अँटी बॉडी” टेस्ट करण्यावर जोर द्यावा. अनेक सर्वेक्षणतून हे समोर आले आहे की मोठ्या प्रमाणात लोकांना करोनाची लागण होऊन सुद्धा गेली व ती अनेकांच्या लक्षात देखील आली नाही. त्यामुळे अशा टेस्टद्वारे एकूण लोकसंख्येच्या मोठ्या हिस्सा ज्याने करोनावर मात केली ते आपल्या लक्षात येईल व अशा लोकांना घरात थांबण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण ही लोक करोनाचा प्रसार देखील करीत नाहीत. त्यामुळे अशा लोकांना त्यांची कामे पूर्वीप्रमाणे करून देण्याची मूभा दिल्यास अर्थव्यवस्था रुळावर आणण्यास खूप मोठी मदत होईल. तसेच खासगी लॅब चालकांना “अँटी बॉडी”चे दर जे सध्या जवळपास हजार रुपये आहेत ते कमी करण्याचे निर्देश दिल्यास अनेक लोक स्वतःहून सुद्धा ती टेस्ट करवून घेतील व यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात पूर्वपदावर येण्यास मदत होईल,” अशी भूमिका बाळा नांदगावकर यांनी मांडली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती कशी आहे?

महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल ४० लाख चाचण्या झाल्या असून, करोना रुग्णांची संख्या आता साडेसात लाख एवढी झाली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे करोना रुग्णांची संख्या गेला आठवडाभर सातत्याने वाढत असून, आज राज्यात १७ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. शहरी भागाबराबरोबर कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद अमरावती जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्याचबरोबर चंद्रपुर, यवतमाळ व धुळे जिल्ह्यातही करोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.