शहरातील लेखानगर समोरील एका इमारतीत जुगार खेळणाऱ्या ४२ जणांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन लाख ८० हजार रूपयांची रोकड हस्तगत केली. मनसेच्या एका आमदाराचा निकटवर्तीय म्हणून परिचित असणाऱ्या राजेश कचरू अडांगळेने नवीन नाशिक मित्र परिवार नावाने स्थापलेल्या संस्थेच्या कार्यालयात हा जुगार सुरू होता. कारवाईत शिवसेनेतून मनसेत गेलेला एक माजी आमदारही हाती लागल्याची जोरदार अफवा पसरली. परंतु, पोलिसांनी त्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. यावेळी रोख रक्कम व संशयितांची वाहने असा एकूण ३४ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या चड्डा पार्क परिसरातील साईराज अपार्टमेंटमध्ये खुलेआम पत्ते खेळले जात होते. त्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दुपारी अचानक छापा टाकल्यावर जुगारींची मोठी फौज पाहून तेही चक्रावले. त्यामुळे जादा पोलीस कुमक मागवून घेण्यात आली.
रंगेहात जुगार खेळताना ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये मनसेशी संबंधित एका माजी आमदाराचा समावेश असल्याची अफवा पसरली आणि घटनास्थळी शेकडोंच्या संख्येने नागरीक जमा झाले.
राजकीय दबावामुळे बडय़ा जुगारींवर कारवाई झाली नसल्याची चर्चा आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राजेश अडांगळेने फेब्रुवारी २०१३ मध्ये या संस्थेची स्थापना केली होती. संस्थेने खेळाडूंना कितपत प्रोत्साहन दिले हा प्रश्न असला तरी जुगाराला चांगलेच प्रोत्साहन दिल्याचे उघड झाले. दोन फ्लॅटमध्ये संशयितांकडून जुगार खेळला जात होता. त्या ठिकाणी दोन लाख ८० हजाराची रक्कम जप्त करण्यात आली. इमारतीच्या बाहेर उभी असणारी जुगारींच्या पाच मोटारी, १४ दुचाकी व दोन रिक्षा असा एकूण ३४ लाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.  या संदर्भात पोलीस उपायुक्त डॉ. बी. एस. स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संशयितांमध्ये मनसेशी संबंधित माजी आमदाराचा समावेश नसल्याचे सांगितले. या प्रकरणी ४२ जणांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.