राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांतीलपाणीसाठय़ात वाढ

पुणे : हक्काचा पाऊस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोसमी पावसाची राज्याला प्रतीक्षा आहे. मात्र, यंदा राज्याच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अनेक पटीने पूर्वमोसमी पावसाची नोंद झाली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली. पूर्वमोसमी पावसामुळे राज्याच्या सर्वच विभागांतील धरणांमध्ये यंदा गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे.

मार्च ते मे या कालावधीत पडणारा पाऊस पूर्वमोसमी म्हणून गणला जातो. मार्चच्या पूर्वीचा पाऊस अवकाळी म्हणून ओळखला जातो. यंदा दोन्ही प्रकारांतील पावसाने राज्यात मोठय़ा प्रमाणावर हजेरी लावली. त्यात पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यातील सर्वाधिक पाऊस एकटय़ा मे महिन्यात पडला आहे. मे महिन्यासह गेल्या तीन महिन्यांत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्प, राज्यावर निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळ आदी सर्वाचा परिणाम म्हणून राज्यात यंदा पूर्वमोसमी पाऊस मोठय़ा प्रमाणावर झाला आहे.

सर्वाधिक पूर्वमोसमी पाऊस कोकण विभागात नोंदविला गेला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा त्यात मोठा वाटा आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबई आणि पालघर जिल्ह्य़ात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे आदी जिल्ह्य़ांमध्ये मोठय़ा पावसाची नोंद झाली आहे. कोकण विभागात एकाही जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस नाही. मध्य महाराष्ट्रातील नगर जिल्हा वगळता इतरत्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक येथे मोठय़ा पावसाची नोंद झाली. मराठवाडय़ातील जालना आणि विदर्भातील अकोला हे दोन जिल्हे वगळता या दोन्ही क्षेत्रांतही बहुतांश भागांत पूर्वमोसमी पाऊस सरासरीपेक्षा अधिक बरसला आहे.

विभागानुसार धरणांतील उपयुक्त पाणीसाठा

विभाग——आजचा पाणीसाठा—–गतवर्षीचा पाणीसाठा

पुणे———-२८.५ टक्के———–१९.५६ टक्के

नाशिक——-३९.५८ टक्के———-२५.०६ टक्के

नागपूर——-४२.८२ टक्के———–३७.९४ टक्के

कोकण——-४८.६७ टक्के———–३६.११ टक्के

औरंगाबाद—-३५.९८ टक्के———–२३.४५ टक्के

अमरावती—–४४.८५ टक्के———–२१.४९ टक्के

मुंबई, पालघरची आघाडी..

राज्यात यंदा पूर्वमोसमी पावसात मुंबई आणि पालघर जिल्ह्य़ाची आघाडी आहे. या दोन्ही भागांत सरासरीपेक्षा तब्बल वीसपट पाऊस झाला आहे. पालघरमध्ये पूर्वमोसमीची टक्केवारी १९२० असून, मुंबईत ती १३७६ इतकी आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी भागांत सरासरीच्या तुलनेत १० ते १५ पटीने अधिक पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव आदी ठिकाणी दुप्पट ते चारपट पाऊस झाला.