औरंगाबादच्या छावणी भागात गॅस्ट्रो या आजाराने अक्षरशः थैमान घातले आहे. सुमारे ९३८ रूग्णांना उपचारांसाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ९३८ पैकी ६०० रूग्णांना अॅडमिट करून घेण्यात आले. तर अनेकांना उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, असे शासकीय रूग्णालयाच्या डॉक्टरांनी म्हटले आहे. छावणी भागात राहणाऱ्या शेकडो लोकांना मळमळ, उलटी, जुलाब याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे अनेकांनी उपचारांसाठी शासकीय रूग्णालय गाठले. लहान मुले, महिला, पुरूष, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांचाच यामध्ये समावेश आहे. रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेकांना जमिनीवर गादी टाकून उपचार घ्यावे लागले असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.

गॅस्ट्रोचे रूग्ण वाढल्याने छावणी परिसरातील सैन्य दलाच्या रूग्णालयातही काही रूग्णांना दाखल करण्यात आले आहे असेही डॉक्टरांनी सांगितले. व्हॉल्वच्या दुरूस्तीमुळे छावणी परिसराला औरंगाबाद महापालिकेकडून पुरवले जाणारे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे सैन्य दलासाठी जे पाणी पुरवले जाते तेच पाणी येथील स्थानिकांनाही दिले जाते आहे. या पाण्यामुळेच गॅस्ट्रोची लागण एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली असावी असा अंदाज व्यक्त होतो आहे. पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

मागील दोन दिवसात ५०० पेक्षा जास्त रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. उपचारासाठी जागा नसल्याने अनेक रूग्णांना बाकांवर, जमिनींवर किंवा एकाच खाटेवर सलाईन लावण्याची वेळ डॉक्टरांवर आली. खासगी रूग्णालयांमध्येही काहीजणांनी उपचार घेतले त्यामुळे गॅस्ट्रोची लागण झालेल्या रूग्णांची संख्या समोर आलेल्या संख्येपेक्षाही जास्त असू शकते. खासगी रूग्णालयात नेमक्या किती रूग्णांनी उपचार घेतले हे अद्याप समजू शकलेले नाही.