पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद सोमवारी दुपारपासून सांगलीत उमटले. इस्लामपूर, तासगाव आणि पलूस मार्गावरील रस्ता वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलकांनी नांद्रेत दोन बसवर दगडफेक केल्याने या मार्गावरील बस वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. तर, उसाला एफआरपीनुसार पहिला हप्ता मिळावा या मागणीसाठी शनिवारी रात्री वसंतदादा साखर कारखान्याचे कसबे डिग्रज येथील कार्यालयाला पेटविण्यात आले.
सोमवारी दुपारपासून सांगली इस्लामपूर मार्गावर डिग्रज येथे असलेल्या लक्ष्मी फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. उप अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन निवेदन घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
नांद्रे वसगडे मार्गावर आंदोलकांनी पुन्हा एकदा एसटी बसला लक्ष्य बनवित दगडफेक केली. दोन बसवर दगडफेक झाली असली तरी सायंकाळपर्यंत या संदर्भात अधिकृतपणे कोणतीही तक्रार सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली नव्हती. या मार्गावरील बससेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याची माहिती सांगली आगारातून देण्यात आली. आंदोलन सुरू झाल्याची माहिती कळताच पोलिसांचा फौजफाटा नांद्रे-वसगडेकडे रवाना करण्यात आला. जलद कृती दलाचे एक पथक या मार्गावर तनात करण्यात आले असल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सांगली तासगाव मार्गावर कवठे एकंद या ठिकाणी रास्ता रोको केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत आंदोलकांना बाजूला करून वाहतूक सुरू केली.
दरम्यान, कसबे डिग्रज येथे असणारे वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे ऊस नोंदणी कार्यालय पेटवून दिले. यामध्ये कार्यालयात असणाऱ्या कागदपत्रांची होळी झाली असून याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. कवठेमहांकाळ येथेही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. दरम्यान शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर सांगली जिल्ह्य़ात येत्या २७ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.