|| एजाजहुसेन मुजावर, सोलापूर

सोलापूर जिल्ह्य़ातील तरुणाचा अनोखा उपक्रम; पंचक्रोशीत ग्रंथप्रेमाची चळवळ 

समाजमाध्यमांच्या अतिरेकाने ग्रंथवाचन हरपल्याची ओरड होत असताना सोलापूरनजीक एका गावातील तरुणाने स्वखर्चातून गावाच्या पंचक्रोशीत बैलगाडीतून फिरत्या वाचनालयाचा उपक्रम सुरू केला आहे. ग्रामीण भागात वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी बैलगाडीतून चाललेली या तरुणाची धडपड सध्या कौतुकाचा विषय ठरली आहे.

सोलापूरपासून अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहळ्ळी या छोटय़ाशा गावात काशिनाथ कोळी या तरुणाने पुस्तकवाचनाची गरज लोकांमध्ये बिंबवण्यासाठी हा ज्ञानयज्ञ राबवला.  बैलगाडीतून गेल्या दोन वर्षांपासून दर रविवारी हे वाचनालय गावाच्या पंचक्रोशीत फिरत असून ग्रंथवाचकांची मोठी फौज त्यामुळे तयार झाली आहे.

कोळी यांना मुळात वाचनाची विलक्षण आवड. सोलापुरातील पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयात ते ग्रंथालय लिपिकपदावर सेवेत आहेत. त्यांच्या वाचनालयाचे कामही उत्कृष्ट असून त्याला राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारही मिळाला आहे. याच ग्रंथालयासारखे आपल्या गावातही एखादे छोटेखानी वाचनालय असावे, अशी त्यांची इच्छा होती. यातच पुस्तकांचे गाव म्हणून ओळख मिळविलेल्या भिलार गावाची माहिती त्यांच्या कानी आली. मग आपल्याही गावात असे काही सुरू करण्याचा ध्यास त्यांनी घेतला.

काशीनाथ यांनी स्वत: पदरमोड करून साडेपाच हजार रुपये खर्च करून दोनशे पुस्तके खरेदी केली. ही पुस्तके गावात सर्वाना वाचनासाठी उपलब्ध केली. त्यांच्या या धडपडीकडे गावक ऱ्यांचे सुरुवातीला लक्ष गेले नाही. नंतर आप्तांकडून मिळालेल्या आर्थिक साह्य़ाच्या बळावर त्यांच्या वाचनालय उभारणीला हातभार लागला. आपले वाचनालय समृद्ध करण्यासाठी काशीनाथ यांनी लोकांना जुनी पुस्तके दान करण्याचे आवाहन केले.

पुस्तकदात्यांमुळे वाचनालयाची ग्रंथसंपदा वाढली. दोन वर्षांपासून गावात ‘माउली सार्वजनिक वाचनालय’ मोफत स्वरूपात सुरू झाल्यानंतर काशीनाथ यांनी वाचकांना वाचनालयाकडे खेचून आणण्यासाठी अनेक विधायक उपक्रम हाती घेतले. चक्क बैलगाडीतून फिरते वाचनालय हा त्याच उपक्रमाचा भाग. बैलगाडीतून आलेले फिरते वाचनालय घरासमोर आलेले पाहून शालेय मुले बैलगाडीभोवती गलका करतात. पंचक्रोशीतील लहान मुलांना वाचनाची आवड हळूहळू निर्माण झाली आहे.

भिलार हे महाराष्ट्रातील पुस्तकांचे गाव म्हणून नावारूपाला आले. या गावाच्या धर्तीवर आपल्या गावाचीही स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी आणि गावातील विद्यार्थी, तरुण पिढी, अन्य ग्रामस्थ या साऱ्यांशी या वाचन संस्कृतीचे नाते तयार व्हावे आणि सांस्कृतिकदृष्टय़ा प्रत्येक जण समृद्ध व्हावा, या उद्देशाने मी हे फिरते वाचनालय सुरू केले. ही चळवळ रुजली-वाढली तर वाचन संस्कृती वाढण्यास याची मोठी मदत होईल.         – काशीनाथ कोळी, संस्थापक, माउली सार्वजनिक वाचनालय

काम कसे चालते?

गावातील व परिसरातील विद्यार्थी, तरुणांपर्यंत पुस्तके पोहोचण्यासाठी काशिनाथ यांनी बैलगाडीच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीची चळवळ उभारली आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:च्या ‘सूर्या’ आणि ‘चंद्रा’ या दोन्ही बैलांना जुंपले. एखादे घर किंवा झोपडीपर्यंत बैलगाडीतून काशिनाथ पुस्तके नेतात. ही पुस्तके वाचण्याची आणि वाचल्यानंतर परत करण्याची अट घालून मोफत दिली जातात.