हिंगोली : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित महायुतीच्या आमदारांना शुभेच्छा देण्यासाठी शहरात लावलेल्या महायुतीच्या फलकावरून खासदार हेमंत पाटील यांचे छायाचित्रच बाद झाल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतही गायब असलेल्या खासदारांना कार्यकर्त्यांनी फलकावरूनही बाद केले, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील हे तब्बल पावणेतीन लाखांच्या फरकाने विजयी झाले होते. यासाठी महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी मोठी मेहनत घेतली होती. मात्र विजयी झाल्यानंतर पाटील यांचा हिंगोलीचा ओढा कमी झाला. त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतील नेत्यांना खासदार पाटील यांची गरज असताना ते मात्र नांदेडात आपल्या पत्नीच्या प्रचारातच व्यस्त राहिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा सोडली तर ते फारसे फिरकले नाहीत. यावरून कार्यकर्त्यांमध्ये चर्चाही होत होती.

समाजमाध्यमावर तसे संदेशही फिरत होते. मात्र त्याची तीव्रता लक्षात येत नव्हती. ती लक्षात आली ती झळकलेल्या फलकावरून.

हिंगोली शहरात भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे, शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या निवडीच्या निमित्ताने शहराच्या सर्व प्रमुख चौकात मोठे फलक लावण्यात आले. परंतु नेमके या फलकावर कार्यकर्त्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या छायाचित्राला स्थान दिल्याचे दिसत नाही. यातून सेनेतील सुंदोपसुंदीचे संकेत मिळत आहेत.

वसमतमध्ये तर उघड विरोधाचे वातावरण असल्याने महायुतीच्या अधिकृत व बंडखोर अशा दोन्ही उमेदवारांना पराभवाची झळ सोसावी लागली.

कळमनुरी व हिंगोलीत महायुतीला यश आले तर त्यात खासदार पाटील यांचा वाटा काय, असा सवाल कार्यकत्रे करीत आहेत. सध्या फलकावरून पाटील यांचे छायाचित्र गायब झाले असले, तरीही आगामी काळात राजकारणाचा वेगळा रंग किंवा वळण पाहायला मिळेल, असे नेतेमंडळी बोलत नसली, तरी कार्यकत्रे त्यांच्या मनातलेच अशा पद्धतीने व्यक्त होत आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.