तुम्ही, मुख्यमंत्री, अशोक चव्हाण एकत्र असतील तेव्हा आपण नक्कीच चर्चेला येऊ अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती या अजित पवार यांच्या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली आजपासून कोल्हापुरातून मूक आंदोलनाला सुरुवात होत आहे. त्या निमित्ताने ते माध्यमांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार काल माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की, संभाजीराजेंनी आंदोलन करण्याआधी मुख्यमंत्र्यांशी एकदा चर्चा करायला हवी होती. मात्र आंदोलन करणं प्रत्येकाचा अधिकार आहे. ते जरुर करावं फक्त करोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेऊन करावं. याला उत्तर देताना आज संभाजीराजे म्हणाले, अजितदादांचा मला फोन आला होता. मी त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला भेटून समाजाच्या मागण्या तुमच्या पुढे ठेवलेल्या आहेत. त्यावर तुम्ही चर्चा करावी. आणि जेव्हा तुम्ही, मुख्यमंत्री, अशोक चव्हाण सगळे एकत्र असाल तेव्हा मला बोलवा. मी येईन.

आणखी वाचा- आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन संभाजीराजेंना केलं होतं- अजित पवार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मूक आंदोलनाला आजपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त खासदार संभाजीराजे यांनी समाजाला शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर करोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करुन हे आंदोलन करण्यात यावं असंही त्यांनी समाजाला सांगितलं आहे.

आणखी वाचा- सर्वांचा मान राखून आणि करोना प्रतिबंधाच्या नियमांचं पालन करुन आंदोलन करुया, संभाजीराजेंचं आवाहन

काल समाजाला आवाहन करताना ते म्हणाले, यावेळी ते म्हणाले की कोल्हापुराला वैचारिक, पुरोगामी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातून करत आहोत. त्याचबरोबर त्यांनी शांततेत आंदोलन पार पाडण्याचं आवाहनही केलं आहे. ते म्हणाले, आंदोलनादरम्यान कोणीही कोणत्याही लोकप्रतिनिधींना काहीही उलटसुलट बोलू नये. त्यांचा मान-सन्मान राखून त्यांच्याशी वागा. हे मूक आंदोलन शिस्तीत पार पाडायला हवं.