खासदार विनायक राऊत यांचा आरोप; सिंधुदुर्गमधील आंदोलनात प्रत्यारोप
सिंधुदुर्गातील डम्पर आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात मोडतोड करून काँग्रेसने हे आंदोलन भडकावले, असा आरोप शिवसेना-भाजपने केला असून याप्रकरणी जबाबदार असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली आहे. या आंदोलनाचे श्रेय मिळविण्यासाठी आमदार नीतेश राणे यांनी गुंडांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात मोडतोड सुरू केली असून कालचा प्रकार ही एक नौटंकीच होती, असा आरोप शिवसेनेचे स्थानिक खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात एका पत्रकार परिषदेत खा. राऊत यांच्यासह भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी या आंदोलनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शांततेत चाललेल्या या आंदोलनास काँग्रेसने पोलिसांच्या सहकार्याने भडकावून िहसक वळण देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, असून या प्रकरणाची चौकशीकरून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावरही कारवाई करावी अशी मागणी भांडारी यांनी केली. अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, संदेश पारकर, वैभव नाईक, माजी आमदार प्रमोद जठार आदी स्थानिक सेना-भाजप नेतेही या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. काल शांततेत चाललेल्या या आंदोलनावर पोलिसांनी लाठीहल्ला केला, वैभव नाईक, राजन तेली, तसेच भाजपच्या तालुकाध्यक्षासही मारहाण झाली, असा आरोप भांडारी यांनी केला.
दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी कोकण विभागीय आयुक्त तानाजी संत्रे यांची एकसदस्य चौकशी समिती नेमली असून येत्या चार दिवसांत ही समिती मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असे गृह खात्याच्या सूत्रांनी सांगितले.

कर्मचारी संघटनेचे आंदोलन
काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मोडतोड केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कर्मचारी संघटनेचे पुढील आठ दिवस काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच असा प्रकार पुन्हा लेखणीबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.