बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका बडय़ा उद्योजकाकडून रात्रीच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या घातक रसायनाचे नमुने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले आहेत. येथील एस झोनमधील एका बंद असलेल्या कारखान्याच्या बाजूला असलेल्या पर्जन्यजल वाहिनीत घातक रसायन सोडण्यात आले होते. या रसायनाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तपासणी अहवाल आल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

औद्योगिक क्षेत्रातील सत्तरबंगला भागात असलेल्या डब्ल्यू झोन आणि त्यासमोरील एस झोनमध्ये एका बंद कारखान्याच्या भागात घातक रसायनाने भरलेले टँकर रिते केले असल्याचे उघडकीस आले होते. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी एस झोन भागातील पर्जन्यजल वाहिनीत पिवळ्या रंगाचे रसायन टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले.

केमिकल माफियांना हाताशी घेऊन औद्योगिक क्षेत्रातील ‘जी‘ झोन मध्ये असलेल्या एका बडय़ा उद्योजकांच्या कारखान्यातून हे रसायन आणले जाते. त्यानंतर एस झोनमधील एका बंद असलेल्या कारखान्यात घातक रसायन भरलेले टँकर रिकामे केले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. अशा प्रकारांमुळे येथील नैसर्गिक नाले आणि जलस्रोत दूषित होत असल्याच्या तक्रारी पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या होत्या.

‘दोन दिवसांत कारवाई’

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ‘जी‘ झोनमधील औषधांसाठी लागणारा कच्चा माल तयार करणाऱ्या एका कारखान्यातून रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर सिप्रोफॉक्ससन सेक्ड काँप (उ्रस्र्१ऋ’७ूं्रल्ल २ल्ल िउ१स्र्) हे घातक रसायनाची विल्हेवाट लावली जात असल्याची खात्रीशीर माहिती हाती लागली आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांना विचारणा केली नसता त्यांनी क्षेत्र अधिकारी गजानन पवार यांना संपर्क साधण्यासाठी सांगितले. क्षेत्र अधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांनी नैसर्गिक नाल्यात सोडण्यात आलेल्या रसायनाचे नमुने घेतले असल्याचे सांगत तपासणी अहवाल दोन दिवसांत आल्यानंतर संबंधित कारखान्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.