भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची मुंबईपाठोपाठ पुण्यातीलही सभा रद्द करावी लागणार असल्याचं चित्र आहे. मुंबई उच्च न्यायालयाने चंद्रशेखर आझाद यांना पुण्यातील सभेसाठी परवानगी नाकारली आहे. पुणे विद्यापीठात ही सभा होणार होती. पोलीस याप्रकरणी 4 जानेवारीला न्यायालयात शपथपत्र दाखल करणार आहेत. दरम्यान पोलिसांनी चंद्रशेखर आझाद नजरकैदेत किंवा अटकेत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच आझाद यांना कोरेगाव-भीमाला जाण्यापासून रोखण्यात येणार नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.

चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांच्या सभेला मुंबई न्यायालयाने सभा घेण्यास परवानगी नाकारली आहे. मात्र आमच्या पुढील नियोजनानुसार आज दुपारी गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे अभिवादन करण्यास जाणार आहे अशी माहिती भीम आर्मी शहर अध्यक्ष दत्ता पोळ यांनी दिली आहे.

मुंबईत तीन दिवस नजरकैदैत ठेवल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांची सुटका करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री चैत्यभूमी येथे जात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर मालाडच्या हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते.अनेक सामाजिक संघटनांकडून दबाव आल्यानंतर आझाद यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली.

नजरकैदेतून सुटका करण्यात आल्यानंतर, मी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे जाऊन विजयस्तंभाचे दर्शन घेणारच असल्याचे आझाद यांनी म्हटले होते. दरम्यान त्याआधी पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्यामुळे चंद्रशेखर आझाद यांची मुंबईतील सभा होऊ शकली नाही. वरळीमधील जांबोरी मैदानावर ही सभा पार पडणार होती.

नियोजित कार्यक्रमाप्रमाणे चंद्रशेखर आझाद यांची आज २९ डिसेंबर रोजी वरळीच्या जांबोरी मैदानात संध्याकाळी ४ वाजता सभा होणार होती. वरळी पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. मात्र तरीही सभा होणारच असा निर्धार भीम आर्मीने केला होता. चंद्रशेखर आझाद मालाडच्या हॉटेल मनालीमध्ये थांबले होते. नंतर पोलिसांनी त्यांना अज्ञातस्थळी नेलं होतं.

आझाद पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यानिमित्त त्यांच्या राज्यात विविध ठिकाणी पाच सभा नियोजित होत्या. त्यातील पहिली सभा २९ डिसेंबर रोजी वरळीच्या जांबोरी मैदानात संध्याकाळी ४ वाजता होणार होती. त्यानंतर ३० डिसेंबरला पुण्यात सभा, ३१ डिसेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याख्यान, १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, २ जानेवारीला लातूर येथे सभा त्यानंतर ४ जानेवारीला अमरावती येथे जाहीर सभा असा नियोजित कार्यक्रम होता.