मुंबईचा वीज पुरवठा खंडित झाल्याच्या घटनेनंतर राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. त्यावरून त्यांनी सविस्तर भूमिकाही मांडली असून, याप्रकरणात भाजपानं आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मुंबईत सोमवारी अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड या शहरांना याचा फटका बसला. या प्रकरणावर भाष्य करताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी यामागे घातपात असल्याची शक्यता आहे, असं म्हटलं होतं. त्यावर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

“कायम डोक्यात जातीय विचारांमुळे अंधार असलेले महाराष्ट्राचे ग्रीडफेल मंत्री नितीन राऊत यांनी परवाची ग्रीडफेल हा घातपात असल्याचा दावा केला आहे. इतक्या मोठ्या घातपाताची पुसटशी कल्पना राज्याच्या गृहखात्याला आली नाही. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामाच दिला पाहिजे, अशी मी मागणी करतो. कारण ऊर्जा मंत्री म्हणताहेत त्यावर विश्वास ठेवावाच लागेल. ज्या घातपातामुळे दोन जणांचे जीव गेले. कोट्यवधी रुपयांचं राज्याचं नुकसान झालं. लाखो लोकांना प्रचंड यातना भोगाव्या लागल्या. हा घातपात आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. हा घातपात आहे, हे ऊर्जा मंत्र्यांना केव्हा कळालं. मग त्यांनी याची कल्पना गृह विभागाला का दिली नाही. याचाही खुलासा करावा,” असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

महापारेषणच्या ४०० के.व्ही.च्या कळवा-पडघा वीजवाहिनी क्रमांक१ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट-२ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता.

ऊर्जा मंत्री काय म्हणाले होते?

सर्किटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं वीज गेल्याचं ऊर्जामंत्र्यांसह महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र, वीज पुरवठा खंडित झाल्या प्रकरणात ऊर्जामंत्र्यांनी ट्विट करत नवी खळबळ उडवून दिली आहे. “सोमवार दिनांक १२.१०.२०२० रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही,” असं ट्विट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर नवा विषय चर्चेत आला आहे.