धुळे व अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुक्रमे सरासरी ६० आणि ६७ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी दिली आहे. दोन्ही महापालिकांची मतमोजणी उद्या सकाळी १० वाजता सुरू होईल.

अहमदनगर महानगरपालिकेच्या १७ प्रभागातील एकूण ६८ जागांसाठी मतदान झाले. अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी १, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी १८ जागा राखीव आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदमच्या भावाने मतदान केंद्रात जाऊन इव्हीएमची पूजा केली. श्रीपाद छिंदम हा वॉर्ड क्रमांक ९ मध्ये अपक्ष उमेदवार आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये चर्चेला उधाण आले आहे. त्याचबरोबर मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाला. भाजपाच्या कार्यकर्त्यांना हा हल्ला केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. भाजपाने मात्र हा आरोप फेटाळला आहे.

धुळे महानगरपालिकेच्या १९ प्रभागातील एकूण ७३ जागांसाठी मतदान झाले. एका जागेची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. एकूण ७४ जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी ६, अनुसूचित जमातीसाठी ५, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २० जागा राखीव होत्या. मतदानाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवारी रात्री भाजपालाच आव्हान देणारे आमदार अनिल गोटे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. शनिवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास कल्याण भवन जवळ दोन जणांनी दुचाकीवरून येऊन दगडफेक केली. या घटनेत वाहनाचे पुढील काच फुटले. मात्र यावेळी गोटे गाडीमध्ये नसल्याने बचावले. मात्र, यावेळी धावपळ झाल्याने अनिल गोटे यांना दम्याच्या त्रास सुरू झाला आणि त्यांचा बीपी वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.