यशाबद्दल साशंकता; परिसरातील राजकीय समीकरणे बदलणे कठीण

कोकणच्या राजकीय क्षेत्रातील वादळी व्यक्तिमत्त्व आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या भरंवशावर काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला असला तरी भाजपा प्रवेशाच्या ‘नियम आणि अटी’ अजून निश्चित न झाल्यामुळे प्रत्यक्ष प्रवेश लांबत राहिला आहे. दुसरीकडे, ज्या कोकणच्या जिवावर ते भाजपाकडून जास्तीत जास्त पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत ते कोकण त्यांच्या हुकमतीखाली किती राहिले आहे, हाही कळीचा मुद्दा आहे.

कोकणच्या राजकारणाचा गेल्या सुमारे दोन दशकांचा पट पाहिला तर असे दिसून येते की, १९९५ मध्ये राज्याची सत्ता हाती आल्यानंतर सेनेने तोपर्यंत कोकणात तग धरून असलेल्या काँग्रेस आणि समाजवादी विचाराच्या जनता पक्षाची धूळधाण करत येथे एकछत्री अंमल प्रस्थापित केला. यामध्ये उत्तर कोकणात रामदास कदम आणि दक्षिण कोकणामध्ये नारायण राणे यांचे महत्त्वाचे योगदान राहिले. याच युती सरकारच्या अखेरच्या सहा महिन्यांसाठी अचानक राणे यांची मुखमंत्रीपदी नेमणूक करण्यात आली. पण त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत युतीची सत्ता गेली आणि पुढील दहा वर्षांत सेनेअंतर्गत राजकारण इतक्या झपाटय़ाने बदलत गेले की, आधी भास्कर जाधव आणि त्यापाठोपाठ नारायण राणे हे सेनेचे कोकणातील दोन मोहरे अनुक्रमे राष्ट्रवादी व काँग्रेसच्या तंबूत दाखल झाले. त्यामुळे कोकणात सेनेला धक्का बसला. सिंधुदुर्गावर राणेंची मजबूत पकड होतीच, शिवाय रत्नागिरी ज्ल्ह्य़िातील सुभाष बने आणि गणपत कदम हे दोन आमदारही त्यांनी काँग्रेसमध्ये ओढून नेले. रामदासभाई मात्र राष्ट्रवादी आणि त्यापाठोपाठ मनसेच्या वादळाला तोंड देत खेडमध्ये आपला गड राखण्याची पराकाष्ठा करत राहिले.

सुमारे एक तपाच्या काळानंतर कोकणातील या राजकारणाचे आणखी एक चक्र पूर्ण झाले आहे. आजच्या घडीला राज्याच्या युती सरकारमध्ये रामदास कदम सेनेचे ज्येष्ठ मंत्री म्हणून मिरवत आहेत. भास्करराव राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ आहेत आणि राणेंनी काँग्रेसचा दोर तोडून टाकला आहे. मागील लोकसभा-विधानसभा निवडणुकांमधील पराभवांसह अनेक बऱ्या-वाईट घडामोडींचा इतिहास मागे टाकत ते राजकारणाचा नवा डाव मांडू पहात आहेत. भाजपामध्ये त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त सतत लांबत असला तरी आज ना उद्या ते घडणार, या विश्वासावर त्यांनी आपल्या राजकीय जीवनातील कदाचित हा शेवटचा जुगार खेळला आहे.

राणे स्वत:ला राज्य पातळीवरील नेते म्हणवत असले तरी काँग्रेस असो वा भाजपा, कोकणचे नेते म्हणूनच त्यांच्याकडे पाहतात, हे स्पष्ट आहे. त्या दृष्टीने त्यांचे उपयुक्ततामूल्य आणि उपद्रवमूल्य जोखून त्यानुसार त्यांना किती महत्त्व द्यायचे, याचा हिशेब हे पक्ष करत आले आहेत. किंबहुना, राणेंचे त्याबाबतचे समज आणि भाजपाचे व्यवहारवादी मूल्यमापन, यातील अंतरामुळेच अजून त्यांच्या भाजपा प्रवेशाचा पेच सुटलेला नाही, असे सांगितले जाते. त्या दृष्टीने विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्य़ात राणेंची कधीच फारशी ताकद नव्हती. जिल्ह्य़ाच्या उत्तर भागात रामदास कदम, संजय कदम, भास्कर जाधव, सदानंद चव्हाण या सेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना कधी फारसा शिरकाव करू दिला नाही. या भागात भाजपाची ताकदही नगण्य आहे आणि उद्या राणे त्या पक्षात गेले तरी या परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही. राणेंबरोबर काँग्रेसमध्ये गेलेले सुभाष बने आणि गणपत कदम हे सेनेचे दोन माजी आमदारही पुन्हा स्वगृही परतले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमधून सेनेत जाऊन आमदार बनलेले उदय सामंत यांनी सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांचा दणदणीत पराभव करत रत्नागिरी तालुका एकहाती आपल्या ताब्यात ठेवला आहे आणि राजापुरात सेनेचे राजन साळवी अपला गड सांभाळून आहेत. थोडक्यात, या जिह्याने राणेंना कधीच साथ दिली नाही.

शिवसेनेचा त्याग करून राणे काँग्रेसमध्ये गेले तेव्हा सिंधुदुर्गातील शिवसेना त्यांनी धुवून नेल्यासारखी परिस्थिती झाली होती. पण काकांच्या खुनाचे शल्य उरी वागवत सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक त्यांना टक्कर देत राहिले, एवढेच नव्हे, तर मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी खुद्द राणेंनाच चीत करत राजकीय सूड घेतला. हा मोदी लाटेचा परिणाम अजिबात नव्हता. गेली सुमारे दोन दशके राणे व त्यांच्या अनुयायांनी केलेल्या मनमानीपणाला स्थानिक जनतेने शिकवलेला धडा होता. कारण याच निवडणुकीत त्यांचे कनिष्ठ चिरंजीव नीतेश कणकवलीतून भाजपाचे तत्कालीन आमदार प्रमोद जठार यांचा पराभव करून निवडून आले. सावंतवाडीतून दीपक केसरकरांनी मागील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडून सेनेचा भगवा हातात घेतला आणि सध्या ते पालकमंत्री आहेत. राणेंचा भाजपा प्रवेश अजून अधांतरी असला तरी राजन तेली आणि काका कुडाळकरांसारखे एकेकाळचे  त्यांचे डावे-उजवे यापूर्वीच भाजपावासी झाले आहेत. त्यामुळे उद्या भाजपामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर त्यांच्यासारख्यांशी जुळवून घेत राणेंना पुढील वाटचाल करावी लागणार आहे.

राजकीय स्थिती जैसे थे

पक्षीय बलाबलाच्या भाषेत बोलायचे तर दोन जिल्ह्य़ांमध्ये मिळून असलेली लोकसभेची एकमेव जागा सेनेकडे आणि विधानसभेच्या ८ जागांपैकी ५ ठिकाणी सेना, २ ठिकाणी राष्ट्रवादी आणि १ ठिकाणी काँग्रेस-नीतेश राणे- आहे. यापैकी नीतेशची जागा राणे भाजपामध्ये गेले तर त्या पक्षाकडे आली असे मानले तरी उरलेल्या जागांपैकी आणखी एखादी वगळता, संबंधित आमदार भाजपाकडे आल्याशिवाय, निर्णायक बदल घडण्याची शक्यता आज तरी दिसत नाही. याचा दुसरा सरळ अर्थ असा की, २००९ पासून कोकणात राणोंची ताकद सतत घटत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ापुरती मर्यादित झाली आहे. अशा परिस्थितीत भाजपा प्रवेशामुळे सत्तेची उब मिळाल्याने राणेंचाच जास्त लाभ होणार आहे.