मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जे छायाचित्र शेअर केल्यामुळे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच छायाचित्राचा संदर्भ पकडून कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी फडणवीस यांच्यावर तोफ डागली. फडणवीस अमेरिकेत जाऊन रोमॅंटिक हिरो अशी स्वतःची प्रतिमा तयार करीत असले, तरी ते हिरो आहेत की व्हिलन हे ठरवावे लागेल, अशी टीका राणे यांनी केली.
वाढती महागाई आणि केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात कॉंग्रेसकडून शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यात नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये केलेल्या भाषणात त्यांनी फडणवीस यांच्या निशाणा साधला. ते म्हणाले, फडणवीस यांनी अमेरिकेत जाऊन स्वतःची रोमॅंटिक हिरो अशी प्रतिमा निर्माण केली. बोटीवर जाऊन कुटुंबीयांसमवेत स्वतःचे फोटो काढले. पण ते हिरो आहेत की व्हिलन ते एकदा ठरवावे लागेल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्याने निर्माण केलेली प्रतिमा फडणवीस यांनी धुळीस मिळवली आहे, असे राणे म्हणाले.