केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आयोजित पत्रकारपरिषदेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यांच्या विधानाला आता राणेंनी प्रतिक्रिया दिली असून त्यांना खरमरीत सवालही केला आहे.

नारायण राणे यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही विधानंही ऐकवली. यावेळी ते म्हणाले, “शिवसेनेने, शिवसेनेच्या नेत्यांनी असे शब्द कधी उच्चारले नाहीत का? १ ऑगस्टच्या बीडीडी चाळीच्या कार्यक्रमाआधी आमच्या पक्षाचे प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाबद्दल वक्तव्य केलं. तोडू वगैरे..आमच्या महिलांवर हात टाकला तर हे करु ते करु वगैरे,,,हात टाकला तर. त्यावर मुख्यमंत्री महाशय काय म्हणाले? ते असं म्हणाले, सेना भवनाबद्दल अशी कोण भाषा बोलेल त्याचं थोबाड फोडा. हा गुन्हा नाही?”

काय म्हणाले होते पवार? येथे वाचा…

ते पुढे म्हणाले, “दुसरं एक वाक्य आहे योगी साहेबांबद्दल. हेच मुख्यमंत्री पूर्वी बोलले होते हा योगी आहे की ढोंगी? याला चपलेने मारले पाहिजे. सुसंस्कृतपणा! पवार साहेब, ज्याला मुख्यमंत्री केला, त्याचा सुसंस्कृतपणा बघा.”

यापुढे त्यांनी अमित शाह यांच्याबद्दलचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्यही ऐकवलं आणि म्हणाले, पवार साहेब, काय सज्जनपणा आहे, काय साळसपणा आहे?

नारायण राणेंच्या वक्तव्यावरुन सुरु असलेल्या गदारोळावर अनेक नेते आपली प्रतिक्रिया देत होते. त्यावेळी आपलं मत व्यक्त करताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते, “मला काही बोलायचं नाही. मी त्याला फारसं महत्व देत नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात.” पवारांच्या याच वक्तव्यावर आता नारायण राणे यांनी टीका केली आहे.