अंतुले यांच्या निधनापासूनच जिल्ह्य़ात काँग्रेसची वाताहत

रायगड जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट असली तरी कोकणातील रायगड जिल्ह्य़ात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पक्षांतराचा काँग्रेसवर काहीच परिणाम होणार नाही. आधीही रायगडकरांनी राणे यांचे नेतृत्व स्वीकारले नव्हते.

माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या निधनानंतर रायगड जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्षाची अवस्था वादळात भरकटलेल्या नावे प्रमाणे झाली आहे. पक्षाला दिशा देणारे आणि संघटन मजबूत ठेवणारे नेतृत्वच शिल्लक राहिले नसल्याने जिल्ह्य़ात पक्षाची वाताहत सुरू झाली. पक्षात मरगळ पसरल्याने कार्यकर्त्यांमध्येही अनुत्साह आहे. एकेकाळी अलिबाग, पेण, श्रीवर्धन आणि पनवेल या मतदारसंघात काँग्रेसचे मजबूत संघटन होते. आज मात्र पेण आणि महाड नगरपालिका सोडल्या तर पक्षाचे अस्तित्व शिल्लक राहिलेले नाही.

रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांच्या भाजप प्रवेशामुळे पनवेल आणि उरण तालुक्यातील पक्षाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले. अलिबागमध्ये मधुकर ठाकूर यांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली, पेणमध्ये रविशेठ पाटील यांचे  कर्तृत्व पेण शहरापुरते मर्यादित झाले.

अंतुलेंचा विरोध डावलून २००९ मध्ये श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडल्याने पक्ष जवळपास नामशेष झाला. ही विस्कटलेली घडी अंतुले यांचे जावई मुश्ताक अंतुले यांना बसवता आली नाही. माणिक जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षाला महाड पोलादपूरमध्ये नवचतन्य मिळेल अशी अपेक्षा होती. महाडचा शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागात त्यांची जादू चालली नाही. त्यामुळे जिल्ह्य़ातील काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे.

काँग्रेस पक्ष सोडताना राणे यांनी काँग्रेसला अद्दल शिकविण्याची दर्पोक्ती केली आहे. राणे यांच्यामुळे रायगडमध्ये काँग्रेस संघटनेला धक्का बसेल का, असा प्रश्न उपस्थित केला जातो. जिल्ह्य़ात नारायण राणे यांना मानणारा गट सध्या काँग्रेसमध्ये कार्यरत नाही. किंबहुना राणे यांनी रायगड जिल्ह्य़ात तसे प्रयत्नही केले नाहीत. शिवसेनेतून राणे काँग्रेसमध्ये आल्यावर कोकणातील पक्ष संघटन मजबूत होईल आणि सेनेतील फूट पक्षाच्या पथ्यावर पडेल अशी अपेक्षा काँग्रेसला होती. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात काही प्रमाणात सुरुवातीला तसे घडलेही. पण रायगड जिल्ह्य़ात राणेंचा प्रभाव दिसून आला नाही. श्रीवर्धन पोटनिवडणुकीत राणे समर्थक शाम सावंत यांचा दारुण पराभव झाला, आणि सेनेचे तुकाराम सुर्वे विजयी झाले. या पोटनिवडणुकीनंतर शाम सावंत आणि नारायण राणे कधी श्रीवर्धन मध्ये फिरकले नाहीत. मतदार बांधणी करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला नाही.

काँग्रेसमध्ये असताना राणे यांना कोकण विकासासाठी ठोस भूमिका घेण्याची संधी होती. मात्र, त्यांनी मुलांना अधिकाधिक पुढे आणण्यासाठी सक्रीयता दाखविली. त्याचा

परिणाम म्हणून मतदारांनी राणे आणि त्यांच्या मुलांना नाकारले. त्यामुळे राणे यांच्या काळात जिल्ह्य़ात काँग्रेस पिछाडीवरच राहिल्याचे चित्र होते. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला तरी काँग्रेसला कोणताही फरक पडणार नसल्याची सद्यस्थिती आहे.

पक्ष संघटनेला प्राधान्य नाहीच..

  • काँग्रेसच्या राजवटीत राणे यांनी महसूलमंत्री, उद्योगमंत्री अशी मोठमोठी पदे उपभोगली. पण या पदांचा वापर करून जिल्ह्य़ातील पक्ष संघटन मजबूत व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत. पक्षातील माजी आमदारांनी सुचवलेली कामेही केली नाहीत. या उलट स्थानिकांचा विरोध असूनही दिल्ली-मुंबई कॉरिडोरसारखे प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्थानिकांमध्ये पक्षाबद्दल नाराजी निर्माण झाली.
  • राणे स्वत:ला कोकणचे नेते म्हणवून घेतात, मात्र त्याच कोकणचा रायगड हा देखील भाग आहे. याचा त्यांना विसर पडला. त्यामुळे रायगड जिल्ह्य़ातील काँग्रेस कार्यकत्रे आणि पदाधिकाऱ्यांना ते कधी आपलेसे वाटलेच नाहीत. त्यामुळे ते पक्षात असतानाही रायगड जिल्ह्य़ातील काँग्रेसला काही फायदा झाला नाही आणि ते नसल्याने तोटाही होणार नाही, असा सूर कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो आहे.