केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जन आशिर्वाद यात्रेदरम्यान मंगळवारी अटक करुन जामीनावर सुटका करण्यात आल्यानंतर आज राणेंनी पत्रकार परिषदेमधून आपली भूमिका मांडली. यावेळी राणेंनी मला कोणीही काहीही करु शकत नाही. मी तुम्हा सर्वांना पुरुन उरलोय असा इशारा विरोधकांना दिला. त्याच प्रमाणे राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या तीन वक्तव्यांचा संदर्भ देत त्या वक्तव्यांच्या वेळी गुन्हे दाखल का करण्यात आले नाहीत असा प्रश्न विचारला. यावेळेस राणेंना राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दात या प्रश्नाचं उत्तर दिलं.
नक्की वाचा >> अटक आणि जामीन प्रकरण : पंतप्रधान मोदींशी यासंदर्भात चर्चा झाली का?; राणे म्हणाले…
फडणवीस काय म्हणाले होते?
नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही, त्यांनी संयम दाखवायला हवा होता. पण, राज्य सरकारने केलेल्या बेकायदा कारवाईविरोधात भाजपा राणेंच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं.
राणेंनी काय उत्तर दिलं?
याचसंदर्भात राणेंना पत्रका परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला असताना त्यांनी, “फडणवीस मार्गदर्शन करतात ते मी स्वीकारेन”, असं मत व्यक्त करत पुढच्या प्रश्नाकडे वळले. मात्र फडणवीसांच्या भूमिकेसंदर्भात मोजक्या शब्दात उत्तर दिलं असलं तरी यावेळेस राणेंनी कालच्या संपूर्ण प्रकरणामध्ये पाठिंबा दिल्याबद्दल भाजपाबरोबरच राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले.
काल भाजपाने काय प्रतिक्रिया दिली?
घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन करण्यात आल्याची टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी राणेंना अटक करण्यात आल्यानंतर केली होती. नारायण राणेंना अटक करून घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन करण्यात आलीय. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रांना मिळत असलेल्या मोठय़ा पाठिंब्यामुळे विरोधकांना धक्का बसला आहे. मात्र, अशा कारवायांना भाजप घाबरणार नसून, आम्ही लोकशाही मार्गाने लढू, असे नड्डा यांनी ट्विटरवरुन म्हटलं होतं.
मोदींनी जन आशिर्वाद यात्रा करायला सांगितली
नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सविस्तरपणे आपली भूमिका मांडताना मुख्यमंत्री, शिवसेनेवर निशाणा साधला. त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला. तसेच जन आशिर्वाद यात्रा परवापासून सुरु होत असल्याची घोषणाही राणेंनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये नव्याने सहभागी झालेल्या नेत्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न जाणून घेऊन काम सुरु करण्यास सांगण्यात आल्याचंही सांगितलं.