|| सतीश कामत

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी झालेली भेट आणि कणकवलीत राणेंच्या स्वाभिमान पक्षाचे समर्थक व भाजपचे स्थानिक नेते संदेश पारकर यांच्यात झालेली मारामारी, या दोन घटनांचा परस्परांशी काहीही संबंध नसला तरी दोन्ही घटनांमधून प्रकर्षांने जाणवलेली समान बाब म्हणजे, सत्ताधारी भाजपच्या सावलीला जाऊनही राणेंचा राजकीय संघर्ष संपण्याची काहीच चिन्हे नाहीत, उलट निवडणुका जवळ येतील तसा तो आणखीच तीव्र होण्याची शक्यता आहे.

सुमारे दोन वर्षांपूवी राणेंनी सत्ताधारी भाजपकडे गळ टाकायला सुरुवात केली. राजकारणाच्या बाजारात आपल्याला खूप मागणी आहे, असं त्यांना त्या काळात खरंच वाटत होतं, की नाही, कुणास ठाऊक! पण तसं ते सांगत राहिले आणि भाजपवाल्यांनी त्यांची जागा दाखवत, भरपूर दमवल्यानंतरच पक्षातर्फे राज्यसभेच्या जागेवर तडजोड करायला भाग पाडलं. त्यानंतर आजतागायत भाजपने काहीच किंमत न दिल्यामुळे आपल्या स्वभावानुसार राणे सध्या पुन्हा कमालीचे अस्वस्थ असून, आपल्याला आजही ‘डिमांड’ आहे, हे दाखवण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या धडपडीचा ताजा आविष्कार म्हणजे, त्यांची पवारांशी झालेली भेट. आता ती ‘बंद दाराआड’ झाली म्हणजे नेमकं काय झालं, हे कुणीच सांगू शकत नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणात मुरलेले पवार अशा भेटीत फार काही गंभीर चर्चा करण्याची सुतराम शक्यता नाही. कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ वगळता राणेंचा त्यांना फारसा उपयोगही नाही. पण या निमित्ताने राणे आणि भाजपमधील अंतर वाढायला हातभार लागत असेल तर ती संधी घेण्याची तत्परता त्यांनी या भेटीतून दाखवून दिली.

राणेंना मात्र नजीकच्या काळात पवारांची जास्त गरज लागण्याची चिन्हे आहेत. कारण, लोकसभा निवडणुकांसाठी भाजप-सेना युती जवळजवळ निश्चित आहे. त्या परिस्थितीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून सेनेचे खासदार विनायक राऊत यांची उमेदवारीही पक्की होणार आहे. काही झाले तरी सेनेच्या उमेदवारासाठी राणे काम करू शकत नाहीत. मग थोरले चिरंजीव माजी खासदार नीलेश यांना काँग्रेस आघाडीचा पाठिंबा मिळवून रिंगणात उतरवणे, हा एकच पर्याय त्यांच्यापुढे आहे. त्यात सेनेप्रमाणेच काँग्रेसचीही दारे त्यांना बंद आहेत. अशा परिस्थितीत पवारच त्यांना मदत करू शकतात. या मतदारसंघात काँग्रेस आघाडीकडे उमेदवारच नाही, ही वस्तुस्थिती काँग्रेस श्रेष्ठींच्या गळी उतरवून ते त्यांना कोकण आपल्यावर सोपवण्यास राजी करू शकतात आणि तसे झाले तरच निवडणुकीच्या रिंगणात या आघाडीच्या पाठिंब्यावर नीलेश काहीतरी टीकाव धरू शकतील. अन्यथा त्यांच्यासाठी ही लढाई खूपच अवघड होऊन बसेल, हे उघड गुपित आहे. ही निवडणूक न लढवण्याचा पर्यायही अडचणीचा आहे. कारण तसे केल्यास लढाईआधीच पराभव मान्य करून कट्टर शत्रूपुढे शरणागती पत्करल्यासारखे होईल. त्यामुळे पुढील काही महिने राणेंसाठी खूप निर्णायक ठरणार आहेत. कारण लोकसभा निवडणुकीच्या डावपेचांबाबतची चूक त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरही गंभीर परिणाम करू शकते.

अशा तणावाच्या मानसिक अवस्थेत पवार भेटल्यामुळे थोडा दिलासा वाटत असतानाच आताचे भाजपवासी संदेश पारकर यांच्या कार्यकर्त्यांनी गेल्या बुधवारी कणकवलीत राणेंच्या कार्यकर्त्यांची धुलाई केल्यामुळे एके काळचे त्यांचे चेले आता त्यांच्याच शैलीत प्रतिक्रिया देऊ लागल्याचे चित्र पुढे आले आहे. कारण राणेंच्या राजकारणाला हिंसाचाराची काळी किनार शिवसेनेच्या काळापासून आहे. तशा राजकारणाच्या बळावर त्यांनी सिंधुदुर्ग ताब्यात ठेवला. त्यातूनच त्यांचा बंगला सर्वपक्षीय विरोधकांनी जाळून टाकण्यापर्यंत प्रतिक्रिया उमटली होती. पण शेजारच्या रत्नागिरीत राणेंची डाळ कधीच शिजली नाही. सिंधुदुर्गच्या जनतेनेही अखेर त्याबाबतचा निषेध मतदानातून व्यक्त करत दस्तुरखुद्द राणेंना घरी बसवलं. आता त्यांचे चिरंजीव नीतेश आमदार असलेल्या कणकवलीचे राणे गटाचे नगराध्यक्ष नलावडे यांच्या कार्यकर्त्यांना भिडत पारकरांनी आगामी निवडणुकीच्या काळातील संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण ‘सज्ज’ असल्याचा संदेश आपल्या एके काळच्या गुरूंना दिला आहे.

राणेंच्या राजकीय कारकीर्दीचं भवितव्य सध्या तरी फारसं आशादायी नाही. अशा वेळी आपल्या दोन्ही मुलांचं राजकीय बस्तान तरी नीट बसवणं हा त्यांचा सध्याचा अग्रक्रम स्वाभाविकपणे आहे. पण त्याहीबाबत अवास्तव महत्त्वाकांक्षा आणि राजकीय वास्तवाचं भान असण्याचा अभाव, या दोन दोषांमुळे राजकीय आयुष्याच्या उत्तरार्धात संघर्षांची वेळ राणेंवर आली आहे.