केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. मंगळवारी (२४ ऑगस्ट) राज्यातील विविध ठिकाणी शिवसेना भाजपा आमने-सामने आले. अत्यंत तीव्र स्वरूपाची आंदोलन, प्रतिक्रिया आणि भूमिका यावेळी पाहायला मिळाल्या. दुपारी रत्नागिरी पोलिसांकडून राणेंना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तर रात्री उशिरा अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, सगळ्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज (२५ ऑगस्ट) स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर बोलत आहेत. यावेळी नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला इशारा दिला आहे.

नारायण राणे पत्रकार परिषदेत म्हणाले कि, “तुम्ही कोणीही माझं काहीही करू शकत नाही. आतापर्यंत नेहमीच मी तुम्हा सगळ्यांना पुरून उरलो आहे. मी कोणालाही घाबरत नाही”, असा स्पष्ट आव्हान यावेळी नारायण राणे यांनी दिले आहे. “तुम्हालाही मुलंबाळं आहेत, घरदार आहे हे लक्षात ठेवा”, असा सुद्धा इशारा यावेळी राणेंनी दिला आहे. “शिवसेना वाढली यात माझा मोठा सहभाग आहे. त्यावेळचे कोणीही आता नाहीत”, असं देखील राणे यावेळी म्हणाले.

“चिपळूणमध्ये १७ माणसं होती तिथं प्रचंड गर्दी असं सांगितलं. तिथून पुढे गेलो तर १३ माणसं. आमच्या घरावर किती माणसं आली मोजली नाहीत. आम्ही तिघेही मुंबईत नव्हतो. पोलिसांनी जे करायचं ते केलं. पण तुम्हाला घरं नाहीत? मुलंबाळं नाहीत का?”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीला!

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटलेले असताना पक्षाने राणे यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. याचबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले कि, “माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहीला. त्यामुळे मी जे पी नड्डा, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो.”