सलग पाच दिवस करोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचा आलेख घसल्याने शहरात एक प्रकारे आशादायी चित्र निर्माण झाले असतानाच मंगळवारी करोना रुग्णांच्या आलेखाने पुन्हा एकदा उसळी मारली. एकाच दिवसात तब्बल २९ रुग्ण आढळून आले असून त्यामुळे शहर व तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ६६५ झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ८३० वर पोहचली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये येथील सामान्य रुग्णालयातील एका डॉक्टरचा समावेश आहे.

तीन टप्प्यात मंगळवारी एकूण २०८ करोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यात १७९ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह असून‌ २९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या रुग्णांमध्ये येथील सामान्य रुग्णालयातील ४८ वर्षीय एक डॉक्टर, तालुक्यातील लोणवाडे येथील एक राजकीय पक्षाचे ५८ वर्षीय कार्यकर्ते, आंबेडकर नगरमधील तीन वर्षीय मुलगा, फुले मार्केटमधील चार वर्षीय मुलाचा समावेश आहे. नाशिकच्या वडाळा येथील एका ४५ वर्षीय पुरुषाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

गेल्या आठवड्यात नव्याने आढळून येणाऱ्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याचे आणि करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या बुधवारी तालुक्यात एकूण ३६ नवीन रुग्ण आढळून आले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी हा आकडा बारापर्यंत खाली आला. त्यानंतर हा आलेख रोजच घसरत राहिला. शुक्रवारी नऊ, शनिवारी आठ, रविवारी सात व सोमवारी तीन याप्रमाणे नवे रुग्ण आढळून आले. रुग्णांच्या या घटत्या संख्येमुळे शहरात दिलासादायक चित्र निर्माण झाले असतानाच आता एकाच दिवसात तब्बल २९ नवे रुग्ण आढळून आल्याने मालेगावकरांची चिंता पुन्हा वाढली आहे.

दूध विक्रीतली बेपर्वाई भोवली?

काही दिवसापूर्वी येथील चाळीसगाव फाटा भागात दूध विक्री करणारे तीन-चार शेतकरी व दूध खरेदीसाठी मालेगावातून गेलेल्या काही लोकांची एक चित्रफीत समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली होती. दूध देता-घेतांना शेतकरी तसेच ग्राहकांना फिजिकल डिस्टंसिंग पाळण्याचे कुठलेही भान नसल्याचे या चित्रफितीत स्पष्टपणे दिसत होते. तसेच करोनासंबंधी कुठलीच पर्वा नसल्याचा त्यांचा वावर अधोरेखित करत होता. त्यामुळे अशा या बेपर्वाईमुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती. शहराजवळील लोणवाडे येथील राजकीय पक्षाच्या एका कार्यकर्त्याला करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून येणे व आता ‘त्या’ चित्रफितीतले दूध विक्री करणारे शेतकरी हे लोणवाडे येथील असल्याची प्राप्त होणारी माहिती यामुळे लोकांची त्यावेळची भीती खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लोणवाडे येथील बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील नऊ सदस्यांचेही स्वाब नमुने चाचणीसाठी घेण्यात आले असून त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.