महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १४ वर्धापन दिन आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विष्णुदास भावे नाटयगृहात मनसेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज काय भूमिका घेणार? महाविकास आघाडी सरकारच्या शंभर दिवसांवर काय बोलणार? याची उत्सुक्ता आहे.

जानेवारी महिन्यात मुंबईत मनसेचे पहिले अधिवेशन झाले. त्यात पक्षाची वाटचाल यापुढे हिंदुत्वाच्या दिशेने होईल हे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. सध्या मनसे आणि भाजपामध्ये जवळीक वाढत चालली आहे. भाजपाचे नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी मागच्या काही दिवसात दोन ते तीन वेळा कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली.

त्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि मनसेमध्ये आघाडी होणार अशा चर्चा सुरु असतात. राजकीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजपा एकत्र येऊ शकतात. नवी मुंबईत आघाडीचा पहिला प्रयोग होऊ शकतो असा अंदाज आहे.

आणखी वाचा- “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल”, गणेश नाईकांचं आव्हाडांना प्रत्युत्तर

मनसे या निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी मनसेचा वर्धापनदिन नवी मुंबईत साजरा करण्यात येत असून या वेळी राज्य सरकारच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा राज ठाकरे करतील असेही सूत्रांनी सांगितले.