वाढत्या महागाईच्या विरोधात केंद्र सरकारविरोधातील रोष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर महागाईविरोधात आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा पेठ येथील कार्यालयाबाहेर चुली पेटवून भाकरी थापत सरकारचा निषेध व्यक्त केला.

केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवत असून गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या दरवाढीमुळे सर्व सामान्यांचे जगणे महाग झाले आहे. त्यामुळे महागाईवर सरकारने अंकुश लावण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. यावेळी वंदना चव्हाण म्हणाल्या की, केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून सर्व सामान्य नागरिकांच्या हिताचा एकही निर्णय घेण्यात आलेला नाही. सामान्य नागरिक रस्त्यांवरील खड्यांमुळे त्रस्त असताना हे सरकार उद्योगपतींसाठी ‘रेड कार्पेट’ टाकण्याचे काम करत आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. महागाईमुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर महागाई आटोक्यात आणावी, अन्यथा भविष्यात तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दुसरीकडे ठाण्यात काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात सरकारचा निषेध नोंदवण्यात आले. ठाण्यातील तलावपाळी परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी पिंडदान करून तसेच सरकारच्या नावाने केस काढून मुंडन करत सरकारचा निषेध केला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात महिला घरगुती सिलेंडर घेऊन सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांनी देखील सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या अनोख्या आंदोलनानंतर सरकारला जाग येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.