एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून आज ठिकठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले असून त्यांच्यामुळेच आपण पक्षत्याग करत असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झालेली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकनाथ खडसे नाशिकमध्ये पोहोचले असता पत्रकारांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली.

एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “मी टीव्हीवर फडणवीसांना करोना झाल्याचं पाहिलं. त्यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा,” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

वेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत करोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली आहे. “लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी,” असं फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा- म्हटल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस मुंबईतील सरकारी रुग्णालयात झाले दाखल; ऑडिओ क्लिपची चर्चा

एकनाथ खडसे यांनी यावेळी आता आपल्या डोक्यावरील टेन्शन कमी झालं असून इतरांना टेन्शन देण्याचं सुरु करणार आहे असा इशारा भाजपाला दिला. तसंच आपल्याला साधा कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादीत काम करायला आवडेल असंही सांगितलं. “भाजपातील अनेक आमदार माझ्या संपर्कात आहे. मात्र पक्षबंदी कायद्यामुळे अनेक अडचणी आहेत,” असं खडसेंनी यावेळी सांगितलं.

“भाजपला शेटजी भटजींचा पक्ष म्हटलं जात होतं. मारवाडी भटांचा पक्ष अशी या पक्षाची ओळख होती. मात्र ही ओळख पुसण्यासाठी आम्ही गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अण्णा डांगें, पांडुरंग फुंडकर यासारख्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम करुन पुसण्याचा प्रयत्न केला. मी २०१४ नंतर बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे असं नुसतं म्हटलं होतं. तेव्हापासून माझ्यामागे चौकशीचा ससेमीरा लागला. मी चार वर्षे त्या ओझ्याखालीच होतो. भाजपमध्ये बहुजनांकडे दुर्लक्ष झालं आहे हे मान्यचं करावं लागेल,” असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.