केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार येऊन चार वर्षांचा कालावधी झाला. या संपूर्ण कालावधीत सताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी चिक्की ते उंदीर घोटाळे करण्यावर भर दिला असून त्या घोटाळ्याचे पुढे काही झाली नाही. या प्रत्येक मंत्र्याचे घोटाळे बाहेर येताच त्या संबधीत मंत्र्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने क्लीन चीट देतात, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला. हे भाजपा सरकार म्हणजे घोटाळे बाज सरकार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.कर्ज माफ झालेले संभाजी पाटील निलंगेकर हे सरकारचे जावई आहेत का, असा सवाल त्यांनी विचारला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात हल्ला बोल आंदोलन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे, प्रवक्ते अंकुश काकडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, या भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा बाहेर काढला. त्यावर कोणी काही बोलण्यास तयार नाही. मात्र एकनाथ खडसे यांच्यावर ज्यावेळी घोटाळ्याचे आरोप झाले. तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांचा अहवाल ठेवला जाईल असे मुख्यमंत्री सांगितले होते. मात्र त्याचे पुढे काही आजवर झाले नाही. त्या प्रकरणा प्रमाणे या उंदीर घोटाळ्याचे होईल अशी शक्यता वर्तवत त्यांनी भाजप सरकारवर टीका केली.

ते पुढे म्हणाले की, संभाजी निलेंगकर यांनी काही लाख रुपयात कर्जाचे सेटलमेंट केली असून हाच न्याय सर्व सामान्य नागरिकाला लावणार का, संभाजीराव निलंगेकर काय सरकारचे जावई का अशा शब्दात भाजपच्या कार्यपध्द्तीवर सडकून टीका केली.

काय आहे प्रकरण?
कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मद्यार्क निर्मिती कारखान्यासाठी महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या दोन बँकेकडून कर्ज घेतले होते. या बँकांनी निलंगेकरांचे कर्जाचे व्याज आणि मुद्दलातले ५१ कोटी ४० लाख रुपये माफ केले. यावरुन वाद निर्माण झाला आहे.