शरद पवार यांच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेते अजित पवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी तडकाफडकी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची ही राजकीय खेळी आहे की, ते पक्षावर नाराज आहेत ते अजून स्पष्ट झालेले नाही. अजित पवारांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना फोन करुन राजीनामा देत असल्याचे सांगितले. पण त्यानंतर ते ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यांच्याशी कोणाचाही संपर्क झालेला नाही. त्यामुळे अजित पवार यांची राजीनाम्यामागची नेमकी भूमिका काय ते अजून स्पष्ट झालेले नाही. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.

शिखर बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार यांचे नाव आल्यामुळे ते आज स्वत:हून मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर होण्यासाठी आले होते. ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावलेले नसताना पवार स्वत:हून हजर होणार होते. एकूणच पवारांनी या प्रकरणात जी भूमिका घेतली त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली. आज राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत आले होते.

निवडणुकीला काही दिवस उरले असताना शरद पवारांच्या या खेळीमुळे राष्ट्रवादीबद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह निर्माण करण्यासाठी अजित पवारांनी राजीनामा दिला असू शकतो अशी एक चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत पुत्र पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर अजित पवार फारसे सक्रिय दिसले नव्हते. आजही शरद पवार यांच्या सिलवर ओक निवासस्थानी राष्ट्रवादीचे सर्व मोठे नेते उपस्थित होते. पण अजित पवारांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी जाहीर करतानाही वाद समोर आले होते. आता कर्जतमधून रोहित पवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. एकूणच पवार कुटुंबातील अंतर्गत स्पर्धेमुळे अजित पवार नाराज असण्याची शक्यता आहे. अजित पवार पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी पुण्यात थांबले होते. पवार कुटुंबात कुठलीही नाराजी नाही असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.