सध्या देशावर तसंच राज्यावर करोनाचं मोठं संकट आहे. दरम्यान, करोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत भाजपने शुक्रवारी ‘ माझे अंगण, माझे रणांगण‘ आंदोलनाची हाक दिली होती. राज्यभरात अनेक ठिकाणी फलक, काळे झेंडे फडकवत, काळ्या फिती लावत भाजपानं सरकारचा निषेध करीत निदर्शनं केली होती. त्यावर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. आंदोलनातून भाजपानं दुहीची बीजं पेरली, जनता माफ करणार नाही, अशी टीका आव्हाड यांनी केली.

“संकटात सापडलेला तुमच्या माझ्या महाराष्ट्रला सावरण्यासाठी एकी महत्वाची आहे. असं असताना महाराष्ट्रद्रोही भाजपानं आंदोलन करून दुहीची बीजं पेरली. जनता हे कधी विसरणार नाही आणि माफही करणार नाही,” असं म्हणत आव्हाड यांनी भाजपावर टीकेचा बाण सोडला. त्यांनी ट्विटरवरून आपलं मत व्यक्त केलं. तसंच यापुढे त्यांनी सत्तेचा हव्यास असा हॅशटॅगही वापरला आहे.

आणखी वाचा- मुंबईतले ठाकरे काही करु शकले नाही, नगरच्या कोपऱ्यात बसून रोहित पवार माझं काय करणार??

केंद्राप्रमाणेच राज्य सरकारनेही शेतकरी, मजूर, कामगार, बारा बलुतेदार व इतर अडचणीत आलेल्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भाजपानं केली. तसंच मुंबईत परिस्थिती गंभीर असून रूग्णांचे हाल होत आहेत. त्यासाठी उपचारांची योग्य व पुरेशी व्यवस्था करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. तसंच जनतेसाठी प्रभावीपणे काम करण्यास सरकारला भाग पाडावे, यासाठी महाराष्ट्र बचाव आंदोलनातील हा दुसरा टप्पा असल्याचं यापूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते.