News Flash

नवी मुंबई विमानतळ नामकरण  आंदोलनाला भाजपची रसद?

भाजपसह इतर राजकीय पक्षांचा या आंदोलनात सक्रिय सहभाग होता.

आंदोलनात कामोठे आणि जासई ग्रामस्थांनी सुमारे आठ लाखांची मदत केली होती.

‘दिबां’च्या नावासाठी वाढता आग्रह

पनवेल : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी झालेल्या आंदोलनामागे भारतीय जनता पक्ष असल्याची चर्चा शुक्रवारी समाजमाध्यमांवर पसरलेल्या एका चित्रफितीमुळे सुरू आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत ज्येष्ठ शेकाप नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी पनवेल, उरणसह इतर तालुक्यांमध्ये गुरुवारी मानवी साखळी उभारण्यात आली. या आंदोलनात वापरलेले हजारो झेंडे भाजपच्या पनवेल कार्यालयात तयार केल्याची चित्रफीत प्रसारित झाल्याने, या आंदोलनाला भाजपने रसद पुरवल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू आहे. विमानतळाच्या नावाचा वाद उकरून शिवसेना आणि सरकारची कोंडी करून विमानतळाचे कंत्राट मिळवण्यासाठी भाजपने हे आंदोलन घडवून आणल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे.

पावसाळ्यात मोकळी जागा उपलब्ध नसल्यामुळे पनवेलची जागा कार्यकर्त्यांना मिळाली आणि झेंडे तयार करण्याचे काम त्या ठिकाणी केले गेल्याने काहींनी गैरसमज निर्माण करण्यासाठी ही चित्रफीत पसरवली, असे ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती’चे सहचिटणीस दीपक म्हात्रे यांनी सांगितले.

भाजपसह इतर राजकीय पक्षांचा या आंदोलनात सक्रिय सहभाग होता. इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आवाहन केल्यावरही अनेक प्रकल्पग्रस्त या आंदोलनात सामील झाले होते. पनवेल, उरणसह मुंबईला काही झेंडे पनवेलहूनच पाठवण्यात आले असले तरी नेमके किती झेंडे आंदोलनात वापरण्यात आले, हे सांगता येणार नाही, असेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

लोकप्रतिनिधींपैकी एकही सदस्य संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित नसताना सिडको महामंडळाने १७ एप्रिलला विमानतळाला नाव देण्याचा राजकीय निर्णय का घेतला, असा प्रश्न प्रकल्पग्रस्त समितीने उपस्थित केला आहे. २०१३ नंतर वेळोवेळी लोकसभेत, त्यानंतर विधिमंडळात दि. बा. पाटील यांच्या नावाची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यामुळे गुरुवारचे आंदोलन एकट्या भाजपचे नव्हते, तर ते सर्व प्रकल्पग्रस्तांचे होते, असे स्पष्टीकरण समितीने केले आहे.

या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रकल्पग्रस्तांना वडापावपासून बिर्याणीपर्यंतच्या खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले होते. आंदोलनात कामोठे आणि जासई ग्रामस्थांनी सुमारे आठ लाखांची मदत केली होती. त्याचप्रमाणे हे आंदोलन प्रकल्पग्रस्तांचेच नव्हते, तर इतर समाजाच्या ५० ते ६० सामाजिक संस्थांचा यामध्ये सहभाग होता. लोकवर्गणीतून हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती दीपक म्हात्रे यांनी दिली.

विरोधकांना नेमका कसला त्रास होतोय ते त्यांनी जाहीर करावे. दि. बा. पाटील यांच्या नावाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे आंदोलनात उतरले होते. दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी सूचना प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व करणाऱ्या राजकीय नेत्यांनी सरकारला का केली नाही ? – प्रशांत ठाकूर, आमदार, भाजप

बाळासाहेबांच्या नावास आठवलेंचा विरोध

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. प्रत्येक प्रकल्पाला बाळासाहेबांचे नाव दिले पाहिजे असे नाही. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नागपूर येथे शुक्रवारी केली.

दि. बा. यांचेच नाव द्या : प्रकाश आंबेडकर

मुंबई : नवी मुंबईच्या इतिहासात दि.बा. पाटील यांचे बहुमोल योगदान आहे. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य-हक्कांसाठी ते लढले. लोकसभेत त्यांनी रायगडचे दोनदा प्रतिनिधित्व के ले, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषविले. त्यामुळे विमानतळाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 1:24 am

Web Title: ncp shivsena navi mumbai international airport bjp movement akp 94
Next Stories
1 सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये करोना संसर्गदर चिंताजनक
2 चंद्रपूरच्या दारुबंदी संदर्भात उच्च न्यायालयाच्या तीनही खंडपीठात कॅवेट दाखल
3 नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनातील झेंडे भाजपा कार्यालयातूनच आले; कृती समितीचं स्पष्टीकरण!
Just Now!
X