पोषण, व्यायाम व झोप ही उत्तम आरोग्याची त्रिसूत्री आहे. तेलकट अन्नपदार्थ खाण्याऐवजी पोषणमूल्य असलेले बदाम सेवन केल्याने फायदा होतो, असे अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ न्यूट्रिशनच्या पोषणतज्ज्ञ माधुरी रुईया यांनी सांगितले. त्यांच्या मते बदाम सेवनाने आपण आरोग्यासाठी गुंतवणूक करीत असतो. कोईमतूर वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी ‘न्यूट्रिशन इन अ‍ॅक्टिव्ह लाइफ स्टाइल’ या विषयावर बोलताना सांगितले की, आरोग्यदायी अन्नसेवन आवश्यक आहे, प्रत्येकाला चांगला आहार मिळतोच असे नाही. पण जर तुम्ही ३० ग्रॅम किंवा २३ बदाम सेवन केलेत तर ते चांगले स्नॅक असते व कुठेही, केव्हाही खाता येतात. घरी, कामाच्या ठिकाणी, चालता चालता तुम्ही ते सेवन करू शकता. माधुरी रुईया यांच्या मते आरोग्यदायी जीवनशैली असली पाहिजे. व्यायाम व योग्य आहार आवश्यक आहे. बदामात आरोग्य देण्याची ताकद आहे, ती आरोग्यातील गुंतवणूक आहे. बदाम का खावेत याचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की, बदामात १५ पोषण घटक असतात; त्यात ई जीवनसत्त्व, चोथा, प्रथिने असतात. त्यामुळे वजन नियंत्रित करता येते व हृदयाचे आरोग्य राखून मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. मधुमेह व लठ्ठपणा हे जीवनशैलीशी निगडित आजार आहेत, त्यामुळे तरुणांनी समतोल व चौरस आहार घेतला पाहिजे. तीन जेवणे व दोन-तीन वेळा पोषणमूल्ये असलेले स्नॅक्स घेतले पाहिजेत. त्यामुळे जंकफूड खाण्याची इच्छा होणार नाही. रोज व्यायाम आवश्यक आहे असे सांगून त्यांनी म्हटले आहे की, फुटबॉल, टेनिस यांसारखे खेळ खेळावेत. झोप रोज सात ते आठ तास असली पाहिजे. आठवडय़ात सर्वच दिवस चांगली जीवनशैली ठेवली पाहिजे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)