विचित्र अटींमुळे पालक वैतागले

‘नाकापेक्षा मोती जड’ ही म्हण वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेसाठी तंतोतंत लागू पडेल, अशा अटी लादण्यात आल्या आहेत. परीक्षार्थीला अध्र्या बाहय़ांचा शर्ट घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचे बटणही मोठे असता कामा नये, तसेच शर्टाचा रंगही भडक नसावा, अशा सूचना सीबीएसई बोर्डाने दिल्या आहेत. रविवारी (६ मे ) ही परीक्षा घेतली जाणार आहे. केवळ एवढेच नाही, तर कोणताही धातू परीक्षा केंद्रात नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे हातात घडय़ाळ, अंगठी, कानातले डूल, पट्टा या वस्तूंचे करायचे काय, असा प्रश्न विचारला जात आहे. नीट परीक्षेतील बोर्डाच्या या ‘नेटके’पणा विरुद्ध पालकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.

सीबीएसई परीक्षेचे यावर्षीचे पेपर फुटल्यामुळे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांना माफी मागावी लागली होती. त्यामुळे आता ताकही फुंकून पिण्याचा प्रकार नीट परीक्षेच्या वेळी अनुभवास येतो आहे. परीक्षेची केंद्रें नेमकी किती ठिकाणी आहेत, एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे ,यासंबंधी अधिकृत माहिती पत्रकारांना सांगू नये असे आदेश देण्यात आले आहेत. परीक्षार्थीना केंद्रात जाताना बुटही घालता येणार नाहीत. चप्पल किंवा स्लिपर अथवा सॅंडल घालावेत, असे सांगण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर किमान तासभर अगोदर विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासाव्यतिरिक्त अन्य बाबींचा ताण अधिक दिला जातो आहे.

परीक्षेत गरप्रकार होतात म्हणून इतकी कडक बंधने लावताना दिलेल्या सूचनांमुळे नवा मनस्ताप सहन करावा लागेल, अशी प्रतिक्रिया जयश्री तावशीकर यांनी व्यक्त केली. खरे तर ही परीक्षा आनंददायी वातावरणात दिली जावी, त्यासाठी आवश्यक त्या सोयी उपलब्ध करुन देण्याऐवजी विचित्र बंधने घालण्यात आली आहेत. शहरातील चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयाचे प्रमुख संजीव सोनवणे यांनी या परीक्षेच्या अकारण कडक यंत्रणेबद्दल नाराजी व्यक्त केली असून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करता यायला हवे. परीक्षा ही आनंददायी वातावरणात देता यायला हवी. परीक्षा केंद्रावर जाताना त्यांच्यावर कोणत्याही बाबीचा ताण असायला नको. काही टक्के मंडळी गरप्रकार करतात म्हणून सर्वानाच त्याचा त्रास देणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.